Blog | Hemp Dainik Gomantak
ब्लॉग

Blog: गोव्यात कोविडनंतर जास्त वाढली गांजाची तस्करी!

Blog: पर्यटन क्षेत्रात गोवा नंबर वन करण्याचे सरकारचे ध्येय आहे, त्याला सुरुंग लावण्याचे काम अमलीपदार्थांचे व्यापारी करीत आहेत.

दैनिक गोमन्तक

Blog: निसर्गसंपन्न छोट्या गोव्याला अमलीपदार्थांची लागवड काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने गांज्याची अनेक प्रकरणे उघड होत आहेत. कोविडनंतर वाढलेल्या पर्यटन व्यवसायामुळे अमलीपदार्थांची तस्करी वाढलेली आहे.

देश-विदेशातून अमलीपदार्थांची आवक वाढलेली आहे. त्यामुळे रेल्वे, विमानानेसुद्धा हे पदार्थ गोव्यात येत आहेत. अशी भयानक परिस्थितीत आपले राज्य देशाची पर्यटन राजधानी होणे कसे काय शक्य आहे? टाळेबंदी उठविल्यानंतर मात्र पुन्हा जोमाने अमलीपदार्थांचा सुळसुळाट सुरू झाला. लाखो रुपयांच्या गांजाची प्रकरणे कोटीच्या घरात केव्हा गेली, हे कळलेच नाही.

पर्यटन क्षेत्रात गोवा नंबर वन करण्याचे स्वप्न गोवा सरकार पाहत आहे. हे सरकारचे ध्येय आहे, त्याला सुरुंग लावण्याचे काम अमलीपदार्थांचे व्यापारी करीत आहेत. या धंद्याची पाळेमुळे उपटून काढली पाहिजेत, तरच गोव्याचे पर्यटन क्षेत्र सुरक्षित राहील, अन्यथा गोवा बदनाम होईल.

गेल्या पाच - सहा वर्षांत मांद्रे, शिवोली, हरमलसारख्या ठिकाणी गांज्याची लागवड करणाऱ्यांना पकडले. शिवोलीत जुलै 2017 मध्ये क्राईम ब्रॅचतर्फे दोन रशियनांकडून 10 लाखांचा गांजा पकडण्यात आला होता. जुलै 2018 मध्ये शिवोली भागात 30 किलो गांजाची शेती नष्ट करण्यात आली. दोन रशियन नागरिकांवर कारवाई करण्यात आली.

डिसेंबर 18 मध्ये एका जोडप्याकडून 15 लाखांचा गांजा जप्त केला. त्यानंतर कांदोळी परिसरात एका बंगल्याच्या परिसरात लागवडीवर कारवाई करण्यात आली. 2019 साली मांद्रे परिसरात 3 रशियनांकडून 64 हजारांचा गांजा जप्त करण्यात आला. मार्च 20 मध्ये शिवोलीत रशियन नागरिकाकडून 1.6 कोटीचा गांजा हस्तगत केला.

जून 2020 मध्ये थिवी परिसरात गांजा लागवडीवर कारवाई झाली. तेथेही 4.75 लाखांचा गांजा जप्त केला आणि ऑक्टोबर 2020 मध्ये मांद्रेत 2 रशियन नागरिकांकडून 3.5 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. यानंतरही पेडणे थोरलेबाग-केरीत एक कोटी रुपयांच्या अमलीपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

गांजा तस्करीच्या घटना पाहता गोव्याला गांजा लागवड, तस्करीचे केंद्रच करण्यात आले आहे. बॉलिवूडच्या अमलीपदार्थ प्रकरणाशी संबंधित अनेकांना गोव्यातून अटक केली. त्यानंतर येथे गांजा लागवड किंवा अमलीपदार्थ निर्मितीची प्रकरणे बंद झाली, पण देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थाची आवक वाढली. गेल्या काही दिवसांत अनेक वेळा अमलीपदार्थांसह दलाल, विक्रेत्यांना पकडले. हा प्रकार बंद झाला नाही, तो सुरूच आहे.

परवा झारखंडच्या मुलीला रेल्वेतून येताना अमलीपदार्थांसह करमळीला पकडले. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी मडगाव -दिकरपाल येथे पुन्हा गांजासह एकाला अटक केली. सर्वच क्षेत्रात गोवा नंबर करण्याचा मुख्यमंत्र्याचा प्रयत्न आणि जिद्द मोठी आहे. त्यांचा दृष्टिकोनही वाखाणण्यासारखा आहे.

आत्मनिर्भरपणा आणि स्वयंपूर्णतेसाठी ते नेहमीच दिलासादायक निर्णय घेतात, पण त्यांच्या या दूरदृष्टीला, निर्णयाला अमलीपदार्थांची तस्करी, वाहतुकीतील बेशिस्तपणा, बेदरकारपणे होणारी पर्यटकांनी लुबाडणूक सुरुंग लावणारी आहे. फक्त एक दिवस मिरामारला स्वच्छता मोहीम राबवून काही होणार नाही, अभिनेते, अभिनेत्री, मंत्री आले आणि कचरा जमा केला आणि दुसऱ्या दिवशी जैसे थे, स्थिती झाली... याला काहीही अर्थ नाही.

नियमित स्वच्छता, पर्यटकांना शिस्त लावणे, प्रसंगी दंडही करणे गरजेचे आहे. अंदमानसारख्या ठिकाणी प्लास्टिक बाळगण्यावरच बंदी आहे, बिस्किटचे कव्हरही बाहेर टाकता येत नाही. ते छोट्या बोटीतच ठेवावे लागते. पर्यटन स्थळावर कुठेही कचरा टाकता येत नाही. मग गोव्यातच का कुठेही कचरा टाका, तंबाखू खाऊन, सिगारेट ओढून तो कचरा कुठेही टाकला जातो.

दुबईत तर साधा चिटोरा टाकता येत नाही, तेथे रस्त्यांवर कुठे पोलीस दिसत नाही, पण कचरा टाकला किंवा काही नियमबाह्य केले तर लगेच तुरुंगाची हवा खायला मिळते. मग गोव्यातच असे का होते, पोलीस रस्त्यांवर उभे असतात, तरीसुद्धा नो एंट्रीतून वाहने ये-जा करतात, सिग्नलवर, चौकात, सर्कलवर पोलिस कोपऱ्यात ढिम्मपणे उभा असतो, तो काहीच हालचाल करीत नाही.

मनात आले तरच शिट्टी कशीही वाजवतो. अशा प्रकारामुळे गोवा पर्यटनाची राजधानी कशी होणार, याचा विचार संबंधितांनी करायला हवा. अमलीपदार्थ आणि पर्यटन व्यवसाय यांचा खूपच जवळचा संबंध आहे. गोव्यात येणारा पर्यटक रमणीय समुद्रकिनारे, निसर्गासाठी येतात, की अमलीपदार्थांसाठी येतात, याचाही विचार करायला हवा.

शिवाय फोफावणाऱ्या वेश्या व्यवसायाचाही संबंध पर्यटनाशी आहेच, तेव्हा राज्य देशाची पर्यटन राजधानी करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी अमलीपदार्थांचा विळखा सोडविण्याबरोबरच पर्यटनात शिस्त आणावी लागेल, त्यासाठी नेमके नियोजन आवश्यक आहे. देशभर किंवा विदेशात पर्यटक वाढीसाठी दौरे करून काही उपयोग होणार नाही, त्यासाठी राज्यात भ्रष्टाचारमुक्त, शिष्टाचारयुक्त आनंदी पर्यटन सुविधा हव्यात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Cash For Job Scam: 'मुख्यमंत्र्यांनी नोकरीत घोटाळा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी', नरेश सावळ यांचे आवाहन

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत होणार दुर्गंधीमुक्त! पोलाद कारखाना, वृक्ष लागवडीसाठी होणार सांडपाण्‍याचा पुनर्वापर

'Cash For Job' ची दिल्लीत चर्चा! नोकर भरतीसंदर्भात श्‍वेतपत्रिका काढा; काँग्रेस सचिव शर्मा कडाडले

SCROLL FOR NEXT