Indian movies आर्टिफिशियल इंटलिजन्स (आयटी), डिजिटल आणि तांत्रिक प्रगतीच्या आगमनामुळे अनेक क्षेत्रांसमोर आज आव्हाने उभी झाली आहेत. चित्रपटसृष्टी देखील त्याला अपवाद नाही.
या अनुषंगाने, गोव्यात हल्लीच आयोजित झालेल्या ‘गोवा फेस्ट -2023’ मध्ये, ‘भारतीय चित्रपटाचे भविष्य: कलात्मक स्वातंत्र्याचे अाविष्कार आणि परंपरांना आव्हान’ यावर परिसंवाद घडून आला.
प्रसिध्द सिने अभिनेता राणा दग्गुबती आणि अभिनेत्री तब्बू यांनी या परिसंवादात आपले विचार व्यक्त केले. सिनेमा समीक्षक राजीव मसंद यांच्या प्रश्नांना त्यांनी आपली उत्तरे दिली.
राणा दग्गुबती हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते आहेत. ‘बाहुबली’ या गाजलेल्या सिनेमातले खलनायक म्हणून त्यांना लोक ओळखतात. दक्षिणेत त्यांची लोकप्रियता अफाट आहे. तब्बूदेखील हिंदी तसेच दक्षिणात्य सिनेमांमधून गाजणारी अभिनेत्री आहे.
राणा यांच्या मते, ‘डिजिटल’ ही बाब भूमिका सशक्त करण्याच्या दृष्टीने सिनेमाला मदत करू शकते. जेव्हा अभिनेत्याला एखादी गुंतागुंतीची किंवा कठीण असलेली गोष्ट (उदा, स्टंट/ॲक्शन) करणे कठीण असते, तेव्हा ‘तंत्र’ त्याच्या मदतीला येऊ शकते.
‘डिजिटल डमी (दुहेरी)चा वापर सिनेमात पूर्वीपासून केला जात आहे आणि त्याचा फायदाही असल्याचे सिध्द झाले आहे’ असे त्यांचे म्हणणे होते.
तब्बूने काहीसे वेगळे मत या परिसंवादात मांडले. ती म्हणाली, ‘तंत्र कितीही पुढारलेले असले तरी काही कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी ‘मानवा’ला पर्याय नाही.’ तिने ही बाब लक्षात आणून दिली की जेव्हा सिनेमा जन्माला आला तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले होते.
पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची त्यांना कल्पना नव्हती. या माध्यमात अनिश्चितता होती पण काळाबरोबर सर्जनशीलता विकसित होत गेली. केवळ मानवी सर्जनशीलतेनेच लोकांना पूर्वी कधीही न पाहिलेल्या गोष्टींचा अनुभव दिला आहे.
राणा यांनी आपल्या मताचा पुरस्कार करण्यासाठी कॅमेऱ्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘अनेकाना वाटले होते की कॅमेऱ्यामुळे ते आपला व्यवसाय गमावतील पण पोर्ट्रेट कलाकार वगळल्यास इतरांना फारसे गमवावे लागले नाही. त्यांनी कॅमेऱ्याशी जुळवून घेतले आणि स्वतःच्या सर्जनशीलतेला सिध्द केले.’
हॉलिवूड किंवा कोरियन चित्रपट उद्योगाच्या बरोबरीने भारतीय चित्रपट उद्योगाला उभे राहणे कसे शक्य आहे यासंबंधीही राणा आणि तब्बू ही दोघे बोलली.
भारतीय चित्रपट उद्योगाची विशेषता सांगताना राणा म्हणाले की, कोरियासारख्या देशात एकच भाषा बोलली जाते तर भारतात भाषांमधली विविधता अनुभवायला मिळते.
ते म्हणाले, ‘भारतातील लोक अनेक भाषा बोलतात आणि तसे असले तरी प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाचे मानून त्यांना समाधानी करण्यावर आपले चित्रपट निर्माते लक्ष केंद्रित करत असतात.
जगभरात स्थलांतरित असलेले भारतीयदेखील भारतीय चित्रपटांमागे असलेली एक सशक्त शक्ती आहे.’ याचवेळी स्थानिक भाषेतल्या चित्रपटांचे स्वागत ज्याप्रकारे होणे आवश्यक आहे तसे होत नसल्याबद्दल राणा यांनी खंत व्यक्त केली.
मात्र राणा आणि तब्बू यांचे याबाबतीत मात्र एकमत होते की तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यास अभिनेते या नात्याने ते उत्सुक आहेत आणि त्यांची सर्जनशीलता शक्य त्या मार्गाने पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.