दशरथ मोरजकर
आजच्या बदलत्या काळात लग्न समारंभामधील विविध विधीत लग्नगीते गाण्याची परंपरा मागे पडत चालली आहे. मात्र ग्रामीण भागातल्या काही महिलांनी ही परंपरा आपल्या गळ्यातून अजून जिवंत ठेवली आहे.
सत्तरीतील रावण-पेळावदे येथील गोड गळ्याची लोकगायिका सावित्री (साळू) गुरुदास मोरजकर या अशा महिलांपैकी एक आहेत. पेळावदे, केरी, मोर्ले, घोटेली आदी भागांत कुणाच्या घरी लग्नसमारंभ असल्यास ‘दिवे लावणी’ ते ‘घर भरणी’ अशा सर्व लग्नविधीत गीते गाण्यासाठी सावित्री मोरजकर यांना हमखास आमंत्रणे येतात.
या आमंत्रणांना मान देऊन आणि आपल्या कलेच्या प्रेमापायी ही लोकगायिका अशा समारंभाला जाऊन आपल्या सुमधुर आवाजात ‘लग्नगीते’ म्हणत समारंभातले वातावरण चैतन्यमय करते. त्यामुळे सर्वांकडून तिला कौतुकाची थाप मिळतेच पण त्याचबरोबर लग्नगीते गाण्याची परंपरा राखून ठेवण्याचे काम तिच्याकडून नकळतपणे होत राहते.
पन्नाशी उलटलेल्या या लोकगायिकेचे माहेर हे केरी, सत्तरीचे. आपल्या माहेरी ती लग्नगीते, फुगडी, दवली मांड गीते, धालोगीते आपल्या बालवयातच शिकली. माहेरच्या धालो मांडावर तिची ही कला बहरत गेली. अजूनही पारंपारिक गीते म्हणणारी एखादी जाणकार महिला भेटली तर तिच्याकडून अशी गीते शिकून घेण्याचा या गायिकेचा उत्साह अजूनही तसाच आहे.
तिला अवगत असलेली ही कला लग्न समारंभ, गणेश चतुर्थी, धालोमांड आदी ठिकाणी सादर करता करता, गेल्या 4-5 वर्षांपासून ही लोकगीते म्हणण्यासाठी आजुबाजूच्या परिसरातून तिला विशेष निमंत्रणे मिळणे सुरू झाले आणि तिच्या लग्नगीते सादरीकरणाची महती वाढत गेली.
लग्न समारंभात दिवा लावणे, जात्यावर दळणे, निमातून बाहेर काढणे, दार धरणे, हळद लावणे, हळद चढवणे, बाशिंग आणणे, बाशिंग चढवणे, नवऱ्याला/नवरीला लग्नासाठी बाहेर काढणे, लग्न झाल्यावर नवऱ्याला घरात घेणे, वाळण उतरणे, दिरांना वाढणे, दार धरणे, कड्यावर बसणे, नाव घेणे, बाशिंग सोडवून माळ्यावर ठेवणे असे विविध आकर्षक लग्नविधी असतात.
या प्रत्येक विधींची गीते आहेत. स्मृतीतून हरवल्यामुळे आजच्या काळात अनेक ठिकाणी ती म्हटली जात नाहीत. पण अशा विधीना हजर राहून सावित्री जेव्हा ही गीते सुरात गाते तेव्हा आपोआपच एका हरवलेल्या काळाला पुन्हा एकदा तिथे पुनर्जीवन लाभते.
एखाद्या घरातून आमंत्रण आल्यावर आपल्या घरातील स्वयंपाकांची कामे किंवा घरातील शेतीकामे लगबगीने आटोपून कार्यात हजर राहणे यात या कलेप्रति असलेले तिचे अपार प्रेमच दिसून येते.
माहेरी, घरची बेताची परिस्थिती आणि लहान भावंडांची काळजी घेण्याची जबाबदारी असल्याने सावित्री औपचारिक शिक्षणाला मुकली. त्यामुळे तिला कोणत्याही भाषेतील अक्षरांची ओळख नाही, तरीपण तिला सर्व लग्नगीते, धालोगीते व इतर लोकगीते तोंडपाठ आहेत.
इतरांचे गायलेली लोकगीते लक्षपूर्वक ऐकून ती ध्यानात ठेवते. अशारितीने एक एक करून अनेक गीते ती डोक्यात साठवत गेली आणि संधी मिळाली तेव्हा गात राहिली.
याव्यतिरिक्त तिला भजने, नामस्मरण, आरत्या, फुगड्या तोंडपाठ आहेत. हा आपला वारसा आपल्या सुना, नातवंडे यांना देण्याच्या प्रयत्नात ती नेहमीच असते.
घरी गणेशचतुर्थी, नागपंचमीला देवासमोर सांगते गाऱ्हाणे
सावित्री मोरजकर यांची आणखी एक खासीयत ही की त्यांच्या एकत्रित कुटुंबातील गणेशचतुर्थी व नागपंचमीला, गणपती आणि नागासमोर उभी राहून ती लांबलाचक गाऱ्हाणे सांगते.
पूर्वी तिचे सासरे घरच्या गणपतीसमोर गाऱ्हाणे सांगायचे पण त्यांच्या निधनानंतर ही परंपरा सावित्रीने सांभाळली आहे. लग्नविधीत तर कोणते प्रकार कधी करावे याचे मार्गदर्शन तिच अनेकदा करीत असते.
गोड आवाज ही तिची खासियत
सत्तरीच्या परिसरात बरेच लोककलाकार लग्नगीते म्हणतात. पण सावित्री मोरजकर यांचा गोड सुमधुर आवाज आणि चांगल्या सुराने गायलेली लग्नगीते लोकांना सहज आकर्षित करतात आणि लोकांचे लक्ष खेचतात.
लग्नविधीत ही गीते लाउडस्पिकरवर ऐकू जात असल्याने जेव्हा तिचा आवाज परिसरात घुमतो तेव्हा लग्नगीते गाणारी ही गायिका सावित्री मोरजकर आहे हे लोकांच्या सहज लक्षात येते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.