Dr Bhimrao Ramji Ambedkar, Dainik Gomantak
ब्लॉग

Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023: वंचित समाजाला दिशा देणारा ज्ञानसूर्य

अमेरिकेच्या कोलंबिया विश्वविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात एम.एची पदवी संपादन करणारे ते प्रथम भारतीय विद्यार्थी होत.

गोमन्तक डिजिटल टीम

जे. अविनाश

युगानुयुगे आणि वर्षानुवर्षे पारतंत्र्याच्या जोखडात जखडून पडलेल्या आणि अशिक्षित, गरिबीत, लाचारी आणि दारिद्र्याच्या गर्तेत लोटून देऊन अक्षरशः उकिरड्यावरचे बहिष्कृत जीवन जगायला भाग पाडलेल्या या देशातील तमाम शोषित, पिडीत, दलित समाजाच्या त्या अंधकारमय जीवनात केवळ आशेचे किरणच नव्हे तर प्रत्यक्षात एका तेजस्वी ताऱ्यानेच तमाम दीन-दलितांच्या जीवनात आशेची किरणे फाकून जगण्याची ऊर्जा आणि प्रगतीची प्रेरणा देऊन गेला. त्या तेजस्वी ताऱ्याचे नाव म्हणजे परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशच्या महू येथे झाला असला तरी बाबासाहेब आंबेडकर खरे कोकणी माणूस होते.

कोकणातल्या रत्नागिरीचेच म्हणायला हरकत नाही. या माणसाने आपल्या देदीप्यमान कर्तृत्वाने साऱ्या जगालाच दीपवून टाकले आणि भारतात एका नव्या युगाची सुरुवात झाली.

या देशास पारतंत्र्याचा तसा फार मोठा इतिहास आहे. आर्य, हुण, पार्शी, डच, फ्रेंच, मुघल, पोर्तुगाल आणि शेवटचे आलेले इंग्रज अशा या लागोपाठ येत गेलेल्या पारतंत्र्यात खऱ्या अर्थाने वेळोवेळी भरडला गेला तो या देशातला मूळ नागरिक, जो आजही गावकुसाबाहेर फेकला गेला असून आजही हीन-दीनतेचे बहिष्कृत आणि अस्पृश्य जीवन जगत आहे.

महार जातीची पुण्याई थोर... ती सारी एकवटून बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपात एका फार मोठ्या ज्ञानसूर्याचा उगम झाला.

बाबासाहेबांकडे पाहताना आपसूकच मनात आल्याशिवाय राहत नाही,की काय ती प्रज्ञा आणि केवढी मोठी ती विद्वत्ता!

असे कोणतेही एखादे क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रात बाबासाहेबांचे कार्य नाही. दलितांच्या प्रश्नांपासून ते महिलांच्या हक्कांपर्यंत, देशाच्या आर्थिक प्रश्‍नांपासून ते रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपर्यंत, घटना तयार करण्यापासून ते लोकशाही स्थापना करण्यापर्यंत वा मंदिर प्रवेशाच्या लढ्यापासून ते चक्क पंथस्थापनेपर्यंत अशा ज्या ज्या क्षेत्रास बाबासाहेबांनी स्पर्श केला तो तो स्पर्श म्हणजे परीस स्पर्श ठरला.

बहिष्कृत हितकारणी सभा, गोलमेज परिषदा, विभक्त मतदारसंघ मागणी, पुणे करार, दलित शिक्षण संस्था, पीपल्स एज्युकेशन संस्था, सिद्धार्थ कॉलेज वा धर्म सुधारणा म्हणून बौद्ध धम्म अवलंब या साऱ्या महत्त्वाकांक्षी सुधारणावादी गोष्टी या देशात घडवून आणून बाबासाहेबांनी एका नव्या वातावरणाची निर्मिती केली जी आज या देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक बळकटीसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेली आहे.

शिक्षणावर त्यांची असीम भक्ती प्रेम होते. ते जीवनाच्या शेवटपर्यंत अठरा-अठरा तास अभ्यास करत त्यामुळे त्यांचा सर्व क्षेत्रांत विविध विषयांचा गाढा अभ्यास होता. अमेरिकेच्या कोलंबिया विश्वविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात एम.एची पदवी संपादन करणारे ते प्रथम भारतीय विद्यार्थी होत.

1923 पासून त्यांनी वकिली करायला सुरुवात केली. तत्पूर्वी ते 1920 मध्ये ‘मूकनायक’ नावाचे पत्रक सुरू करून संपादक बनले. 1924 साली त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची स्थापना करून मुंबई इलाख्यात मोठी सभा भरवली व समाज जागृती केली.

अमरावती येथील प्राचीन अंबाबाई मंदिरात, पुण्यातील पार्वती मंदिरात व नाशिकच्या काळाराम मंदिरातही मंदिर प्रवेशासाठी संघर्ष केला. बाबासाहेबांना या देशातील सर्व शोषित पीडित समाजाचा फार मोठा कळवळा होता.

लंडनमध्ये भरलेल्या तिन्हीही गोलमेज परिषदांना ते दलित, पीडित, शोषित समाजाचे प्रतिनिधी म्हणून हजर राहिले आणि अस्पृश्य गणला गेलेल्या समाजाची आत्मीयतेने बाजू मांडली.

देशाच्या स्वातंत्र्यात समाजातील तळागाळातील सर्व समाजास वाटेकरी करून घेतले. 1932 साली दलितांसाठी विभक्त मतदारसंघाच्या तरतुदीचे बिल ब्रिटिश मंत्रिमंडळापुढे सादर करून मंजूर करून घेतले.

परंतु पुढे महात्मा गांधींच्या प्रखर विरोधामुळे ते बिल बारगळले व त्याचेच रूपांतर पुणे करारात झाले व इथूनच दलितांच्या आरक्षणाचा पुढे निर्मिती झाली.

1936 मध्ये कामगार, मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘स्वतंत्र मजूर पक्षा’ची स्थापना केली आणि त्यातूनच उभारलेल्या लढ्यातून कामगारांना आठ तासांचे काम आणि आठवडी सुट्टी मंजूर करून घेतली.

महिलांच्याही प्रश्‍नासाठी बाबासाहेबांनी आवाज उठवला. हिंदू कोड बिल आणून महिलांनाही मालमत्तेत अधिकार मिळावा म्हणून आवाज उठविला आणि त्यासाठी त्यांना आपल्या मंत्रिपदाचासुद्धा त्याग करावा लागला.

स्वतंत्र भारताचे प्रथम कायदामंत्री म्हणून त्यांची फारच उल्लेखनीय कामगिरी राहिली. देशाच्या घटना निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

आज जो आपला देश सर्व जाती पंथाच्या आणि विविध भाषा संस्कृतीच्या लोकांना बरोबर घेऊन जी यशस्वी वाटचाल करत आहे त्याचे श्रेय देशाच्या राज्यघटनेला देताना त्यासाठी बाबासाहेबांचे स्मरण करावेच लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT