कोणतीही भाषा ही समाजातील लोकांना जोडण्याचं काम करते. जाती-धर्मापलीकडे असलेली भाषा ही आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचं माध्यमच आहे. आपला भारत (India) देश जसा कला आणि संस्कृतीनं नटलेला आहे तसाच इथल्या भाषेतील वैविध्यामुळेही जगभरात ओळखला जातो. गोव्यात (Goa) उर्दू भाषेचे चलन फारसे नाही त्यामुळेच मूळ ‘चार्टर्ड फायनान्शियल अॅनलिस्ट ‘आणि सहाय्यक प्राध्यापक असलेल्या अमेय कामत गोव्यातील उर्दू भाषेतील एकमेव कवी असणे अप्रुपाचे ठरते.
अमेय कामत आपला प्रवास उलगडताना सांगतात, ‘मुळात माझ्या घरीच साहित्याचं वातावरण होतं. माझे बाबा अशोक कामत हे कोकणी साहित्यकार होते. त्यामुळे साहित्याची आवड मला आधीपासूनच होती. मीदेखील सुरुवातीला कोकणीतच कविता करायचो. हळूहळू मी हिंदी भाषेकडे वळलो आणि हिंदीतून कविता करू लागलो. मला एक गोष्ट जाणवली की, हिंदीतून कविता करत असताना भावना व्यक्त करण्यासाठी कुठेतरी शब्दांची मर्यादा आडवी येते. त्याचमुळे उर्दू शिकण्याची जिद्द माझ्या मनामध्ये निर्माण झाली. सुरुवातीला मी उर्दूतील पुस्तकं वाचायला सुरुवात केली. ही भाषा मी आपलीशी करून घेत त्यातले शब्द, त्यांचे अर्थ समजून घ्यायला सुरुवात केली.आणि हळूहळू मी उर्दूमध्ये व्यक्त होऊ लागलो. आता जवळपास 2-3 वर्षांच्या अभ्यासानंतर मी उर्दू भाषेमध्ये कविता, शायरी, गझल लिहिण्यास सुरुवात केली. आणि माझं पहिलं उर्दू भाषेतील ‘शु’आ’-ए-मेहर’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे.’
‘आपल्या समाजामध्ये धर्म, जाती आणि भाषा यावरून वर्षानुवर्ष एक दरी निर्माण झालेली आहे . भाषेला धर्म जोडला जाऊन त्यामधून चुकीच्या गोष्टी निर्माण केल्या जात आहेत. ज्यावेळी मी उर्दूमध्ये पुस्तक प्रकाशित करण्याचं ठरवलं, त्यावेळेला मलासुद्धा टोमणे दिले गेले की, ‘उर्दू शिकतोयस तर मग पाकिस्तानात जा..’ यावरूनच समाजातील लोकांची मानसिकता आपल्याला कळू शकते. आपण जात-धर्म या तराजूमध्ये भाषेला तोलणं खरंतर चुकीचंच . कुठलीही भाषा ही लोकांना जोडण्याचं काम करते. कुठल्याही भाषेला धर्माची गरज नसते. उर्दू भाषा ही फक्त मुस्लिम लोकांची भाषा आहे असा एक गैरसमज अनेक वर्षांपासून आपल्या देशात आहे, पण खरंतर गेल्या 400 हून अधिक काळ हिंदू माणसंही उर्दू भाषेला जपत आली असल्याचा इतिहास आहे. आपल्या भारतीय (India) भाषांपैकीच उर्दू ही एक भाषा आहे आणि ही अमुक एका धर्माची भाषा असा विचार न करता, त्यापलीकडे जाऊन आपण विचार करणं गरजेचं आहे. मी स्वतःला भाषेपलीकडचं समजतो, त्यामुळे मी अशा लोकांकडे दुर्लक्ष करून, माझा हा प्रवास पुढे सुरू ठेवला आहे.’ त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘शु’आ’-ए-मेहर’ या पुस्तकातील एका कवितेच्या काही ओळी अशा आहेत..
तारीफ नुमाइश के..
तारीफ़ नुमाइश के खूबसूरत जुतों की,
होती हमसे बयाँ ही नहीं
खाल उधड गयी किस बेजुबाँ की,
किसी को इसका गुमाँ नहीं
झूमती लौ के परवाने हैं बहुत,
तवज्जोह मिली जलती बातीको भी,
पर कोई नहीं सोचे तपते तेल का,
जिसके जलने का निशाँही नहीं
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.