Oracle Layoffs 2026 AI Job Cuts: सकाळी उठल्यानंतर फोनवर एक ईमेल येतो, "अत्यंत जड अंतःकरणाने सांगावे लागत आहे की, आज तुमचा कंपनीतील शेवटचा दिवस आहे." माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'ओरॅकल' मधील अनेक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार नुकताच घडला. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय डझनभराहून अधिक कर्मचाऱ्यांचे ऑफिस अॅक्सेस बंद करण्यात आले असून, त्यांना ले-ऑफचे कागदपत्रे पाठवण्यासाठी वैयक्तिक ईमेल आयडी मागण्यात आले. एआयच्या वाढत्या प्रभावामुळे आणि कंपनीच्या आर्थिक गणितांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर येत आहे.
ओरॅकल सध्या एआय डेटा सेंटर्स आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यासारखा वाहत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने तब्बल 28.5 अब्ज डॉलर भांडवली खर्च केला, जो गेल्या वर्षी याच काळात केवळ 8.5 अब्ज डॉलर होता. या वर्षात एआयवर 90 ते 95 अब्ज डॉलर खर्च करण्याचे ओरॅकलचे उद्दिष्ट आहे. एआय क्षेत्रातील स्पर्धा जिंकण्यासाठी प्रचंड गुंतवणूक करावी लागत असल्याने कंपनीचा फ्री कॅश फ्लो उणे 5.4 अब्ज डॉलरवर गेला आहे. या प्रचंड खर्चाची भरपाई करण्यासाठी आता कर्मचाऱ्यांची कपात करुन खर्च कमी केला जात आहे.
ओरॅकलने आर्थिक वर्ष 2026 मध्ये आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 13 टक्के म्हणजेच सुमारे 21,000 कर्मचाऱ्यांना आधीच नोकरीवरुन काढून टाकले. मे अखेर कंपनीकडे फक्त 1.41 लाख कर्मचारी शिल्लक राहिले होते. एआय आणि ऑटोमेशनमुळे अनेक पारंपरिक कामांची गरज उरलेली नाही, असा दावा कंपनी करत आहे. परंतु हे चित्र केवळ ओरॅकलपुरते मर्यादित नसून संपूर्ण आयटी इंडस्ट्रीमध्ये सध्या ले-ऑफची लाट पसरली आहे. Layoffs.fyi च्या आकडेवारीनुसार, एकट्या सप्टेंबरच्या सुरुवातीला उबर, पेपल, अॅपल आणि झोमॅटो सारख्या कंपन्यांमधून 6000 हून अधिक कर्मचाऱ्यांना (Employees) नारळ देण्यात आला आहे. 2026 मध्ये आतापर्यंत 128,000 हून अधिक टेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
तज्ज्ञांच्या मते, या कपातीमागे केवळ एआय हे एकमेव कारण नाही. केवळ एक-चौथाई कपात एआयमुळे होत असून, उर्वरित मोठा भाग हा कंपन्यांचे बजेट रीसेट करणे आणि टीम स्ट्रक्चरची पुनर्रचना करणे हा आहे. एआयच्या नावाखाली कंपन्या आपला अनावश्यक खर्च कमी करत आहेत. गार्टनरच्या अहवालानुसार, जे उद्योग केवळ कर्मचाऱ्यांना काढून पैसे वाचवत आहेत, ते भविष्यात मागे पडू शकतात; कर्मचाऱ्यांचे री-स्किलिंग करणाऱ्या कंपन्याच यात टिकून राहतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.