Indian Railways Privilege Pass Rules Update 2026: भारतीय रेल्वेने आपल्या कर्मचारी, पेन्शनर्ससाठी आणि विधवा पास धारकांसाठी दिवाळीच्या काळात एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी दिली. रेल्वे बोर्डाने 30 ऑक्टोबर 2026 रोजी जारी केलेल्या एका नव्या आणि महत्त्वाच्या आदेशानुसार, प्रिव्हिलेज पासच्या नियमांमध्ये मोठा दिलासादायक बदल करण्यात आला.
आता रेल्वे पासधारक देशातील सर्वात प्रीमियम आणि लोकप्रिय गाड्या जसे की राजधानी, शताब्दी आणि दुरंतो एक्सप्रेसमध्येही त्यांच्या मूळ पात्रतेपेक्षा उच्च श्रेणीत प्रवास करु शकणार आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना केवळ त्यांच्या सध्याच्या पात्रतेचे तिकीट आणि उच्च श्रेणीचे तिकीट या दोघांमधील केवळ तफावतीची रक्कम भरावी लागणार आहे.
पूर्वी रेल्वेच्या नियमांनुसार ही अपग्रेडेशनची सुविधा केवळ सामान्य मेल आणि एक्सप्रेस गाड्यांपुरतीच मर्यादित होती. परंतु, रेल्वे सर्व्हेंट्स पास रुल्स 1986 मध्ये सुधारणा करत आता हा नियम राजधानी, दुरंतो आणि शताब्दीसारख्या सर्व प्रीमियम गाड्यांसाठीही लागू करण्यात आला. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या पासची पात्रता थर्ड एसीची असेल आणि त्याला सेकंड एसीमधून प्रवास करायचा असेल, तर तो दोन्ही श्रेणींमधील भाड्याचा फरक भरुन प्रीमियम ट्रेनमध्येही कन्फर्म तिकीट मिळवू शकतो. या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांचा (Passenger) प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
हा नवीन नियम तातडीने लागू करण्यासाठी रेल्वे बोर्डाने 'क्रिस' आणि 'एचआरएमएस'च्या आयटी टीम्सना यंत्रणा त्वरित अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. यंत्रणा अपडेट झाल्यानंतर कर्मचारी आणि पेन्शनर्स आयआरसीटीसी किंवा रेल्वे तिकीट काऊंटरवरुन फरक भरुन आपले तिकीट सहजरीत्या बुक करु शकतील. रेल्वे मंत्रालयाच्या वित्त संचालनालयाच्या मंजुरीनंतर जारी करण्यात आलेल्या या नव्या आदेशामुळे लाखो सेवारत रेल्वे कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि विधवा पास धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.