Gold Price Prediction April 2026: मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेत गेल्या तीन आठवड्यांपासून सुरु असलेले तेजीचे वादळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. या आठवड्यातही सोन्याच्या किमतीत 1.65 टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली असून सोन्याने प्रथमच दीड लाखांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. शुक्रवारी व्यापारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा जून वायदा प्रति 10 ग्रॅम 1,52,690 रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचला.
सोन्यापाठोपाठ चांदीनेही जोरदार मुसंडी मारली असून चांदीचा मे वायदा प्रति किलो 2,43,300 रुपयांवर स्थिरावला आहे. किरकोळ बाजारातही हीच स्थिती पाहायला मिळाली. आठवड्याच्या सुरुवातीला 1,47,891 रुपयांवर असलेले 999 शुद्धतेचे सोने शुक्रवारी 1,50,327 रुपयांवर पोहोचले, तर चांदीचा दर 2,31,028 रुपयांवरुन थेट 2,39,934 रुपये प्रति किलो झाला.
बाजारातील या अभूतपूर्व दरवाढीमागे जागतिक स्तरावरील अनेक महत्त्वाची कारणे आहेत. सध्या जागतिक राजकारणात असलेल्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार 'सुरक्षित गुंतवणूक' म्हणून सोन्याकडे वळत आहेत. तसेच, अमेरिकन डॉलरमध्ये आलेली कमजोरी सोन्याच्या झळाळीला खतपाणी घालत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धविरामाच्या चर्चेमुळे जागतिक तणाव काहीसा कमी झाला असला, तरी त्याचा परिणाम डॉलरवर दबावाच्या स्वरुपात दिसत आहे. डॉलर कमकुवत झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने खरेदी स्वस्त पडते, परिणामी मागणी वाढते.
दुसरीकडे, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट आणि कमी होणारी महागाई यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह येणाऱ्या काळात व्याजदरात कपात करु शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही शक्यता सोन्यासाठी नेहमीच पोषक मानली जाते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केल्यास, कॉमेक्सवर सोने 4,787.40 डॉलर प्रति ट्रॉय औंसवर बंद झाले. तज्ज्ञांच्या मते, 5000 डॉलरचा स्तर हा सोन्यासाठी (Gold) एक मोठा मानसिक आणि तांत्रिक अडथळा आहे. जर सोन्याने हा स्तर ओलांडला, तर बाजारात आणखी मोठी तेजी पाहायला मिळू शकते. घरगुती गुंतवणूकदारांसाठी डॉलरच्या तुलनेत रुपयाची चाल अत्यंत महत्त्वाची ठरेल. सध्या रुपयामध्ये आलेल्या थोड्या मजबूतीमुळे भारतीय बाजारात सोन्याच्या किमती काहीशा संतुलित राहिल्या आहेत.
मात्र, डॉलर पुन्हा वधारल्यास घरगुती बाजारात सोन्याचे भाव नवे उच्चांक गाठू शकतात. तांत्रिकदृष्ट्या MCX वर सोन्यासाठी 1,48,000 ते 1,46,000 रुपयांच्या दरम्यान मजबूत सपोर्ट आहे, तर वरच्या बाजूला 1,54,000 ते 1,55,000 रुपयांच्या स्तरावर नफावसुलीमुळे अडथळा येऊ शकतो. चांदीसाठी 2,30,000 रुपयांचा स्तर महत्त्वाचा आधार ठरणार आहे. सामान्य ग्राहकांसाठी मात्र ही दरवाढ चिंतेची बाब ठरत असून, लग्नसराईच्या काळात सोन्याचे हे भाव सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे राहिलेले नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.