Zambaulim Gulal Utsav: हरी रे रमणा! जांबावली परिसर न्हाला गुलाबी रंगात! श्री दामोदर देवाचा 'गुलालोत्सव' सोहळा जल्लोषात साजरा

Gulalotsav Goa: रामनाथ मंदिराच्या प्रांगणात ठेवलेल्या पालखीतील श्री दामबाबांच्या मूर्तीवर गुलाल उधळण्यास सुरुवात झाली व नंतर गुलालोत्सवाला प्रारंभ झाला.

सासष्टी: गोव्यातील प्रसिद्ध असा जांबावली शिमगोत्सवातील गुलालोत्सव मंगळवारी (ता.२५) श्री रामनाथ दामोदर देवस्थानच्या प्रांगणात जल्लोषात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

‘श्री रामनाथ दामोदर महाराज की जय’ या जयघोषात व ‘राम राघव गोविंदा, हरी रे रमणा गोविंदा, माधव गोविंद हरी रमणा’ असा गजर करीत पालखीत विराजमान झालेल्या श्री दामोदर देवाच्या मूर्तीवर जमलेल्या हजारो भाविकांनी गुलाल उधळला तसेच एकमेकांना गुलाल लावण्याचा मनसोक्त आनंद लुटला. यामुळे जांबावली परिसर गुलाबी रंगाने आच्छादला गेला व गुलाल आसमंतात पसरला. गुलाल उधळताना भाविकांच्या आनंदाला उधाण आल्याचे दिसून येत होते. अबालवृद्धांनी, युवकांनी जात, धर्म, पंथ व आपसातील सर्व मतभेद विसरून गुलालोत्सवात सहभाग घेतला. जांबावलीतील शिमगोत्सव मठग्रामस्थ हिंदू सभेतर्फे आयोजित केला जातो.

दुपारी ३.३० वा. श्री रामनाथ मंदिराच्या प्रांगणात ठेवलेल्या पालखीतील श्री दामबाबांच्या मूर्तीवर गुलाल उधळण्यास सुरुवात झाली व नंतर गुलालोत्सवाला प्रारंभ झाला. सायंकाळी ५ वाजता पालखी वाजत-गाजत ढोलताशांच्या गजरात श्री दामोदर मंदिराच्या प्रांगणात आणण्यात आली व अनेक भक्तांनी पालखीभोवती सुवारीवादन व ढोलताशांच्या तालावर पिंगा खेळून वातावरण अधिक रंगतदार केले.

दामोदर देवाची ख्याती सर्वदूर पसरली असल्याने सकाळपासून मडगावसह गोव्यातील इतर भागातून भाविक जांबावलीत यायला सुरुवात झाली होती. शेजारच्या राज्यांतूनही मोठ्या संख्येने भाविक आले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. मात्र, पोलिसांनी योग्य उपाययोजना केल्यामुळे उत्सवावर त्याचा मोठा परिणाम झाला नाही. कोणताही अनुचित प्रकार न घडता गुलालोत्सव शांततेत व शिस्तीत पार पडला.

कुशावती नदीकाठी स्नानासाठी गर्दी

जांबावली गावात श्री दामोदर मंदिराच्या मागे असलेल्या कुशावती नदीकाठी लोकांनी स्नानासाठी गर्दी केली होती. काही लोकांनी स्नानासाठी रिवण येथील झऱ्याकडे कूच केली. भाविक सायंकाळीही श्री दामबाबाच्या दर्शनासाठी जांबावलीला येत होते, त्यामुळे रात्री १० वाजेपर्यंत जांबावलीत भाविकांची गर्दी होती. रात्री ११ वाजता नवरदेवाची वरात कार्यक्रम रंगला व त्यानंतर संगीत सभेचा कार्यक्रम झाला. बुधवार, २६ रोजी सकाळी ११ वाजता धूळपेटीने शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.

मडगावात मात्र सामसूम

जांबावलीतील शिमगोत्सव हा खास मठग्रामस्थांचा उत्सव. त्यामुळे मडगावमधील सर्वचजण या उत्सवाला व खासकरून गुलालोत्सवाला आपली खास हजेरी लावतात व श्री दामबाबाचे आशीर्वाद घेतात. आज जांबावलीत गुलालोत्सव सुरू असताना मडगावात मात्र सर्वत्र सामसूम वातावरण होते. वर्षपद्धतीप्रमाणे बाजारकरांनी आपली दुकाने बंद करून गुलालोत्सवासाठी जांबावलीत प्रयाण केले. मडगावातील खासगी व सरकारी कार्यालयांतील बहुतांश कर्माचाऱ्यांनी अर्धा दिवस सुट्टी घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com