Sinquerim Hill: सिकेरी टेकडी जपा अन्यथा... पर्यावरण संवेदनशील जागेत पंचतारांकित प्रकल्पाला विरोध, न्यायालयात जाण्याचा इशारा

Sinquerim Hill Project: अलीकडेच राज्य सरकारने इंडियन हॉटेल्स कंपनीकडे पुरवणी भाडेपट्टी करार केले असून, त्यानुसार सिकेरी टेकडीवर विकास करण्यासाठी संबंधितांना परवानगी दिली आहे.

Sinquerim Hill Project Updates

म्हापसा: अलीकडेच राज्य सरकारने इंडियन हॉटेल्स कंपनीकडे पुरवणी भाडेपट्टी करार केले असून, त्यानुसार सिकेरी टेकडीवर विकास करण्यासाठी संबंधितांना परवानगी दिली आहे. मुळात हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आणि जैविकदृष्ट्या संरक्षित क्षेत्र असताना, राज्य सरकारने विद्ध्वंसाला चालना देणारे पाऊल उचलले आहे. सरकारने ही टेकडी भावपिढीसाठी सुरक्षित ठेवावी. त्यामुळे प्रशासनाने आपल्या निर्णयात वेळीच सुधारणा न केल्यास आम्ही न्यायालयात जाणार, असे कळंगुट मतदारसंघ फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दिवकर यांनी स्पष्ट केले.

सोमवारी (ता.३) म्हापशात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आग्नेलो बॅरेटो, लॉरेन्स सिल्वेरा, कौटिल्डा ब्रागांझा, क्रुझ सिल्वेरा, आगुस्तिन डिकॉस्ता आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

दिवकर म्हणाले की, सिकेरी टेकडीवर (हिल) विकसकाचे हित जपण्यासाठी पर्यावरण दृष्टिकोनातून अतिसंवेदनशील जागेत सरकार काँक्रीटकरण करू पाहते. याने जैवविविधता नष्ट होईल. मुळात सरकारने येथील सजीव सृष्टीची दखल घेत यास्थळी जागतिक दर्जाचे वनस्पती उद्यान प्रस्थापित करावे. त्यातून सिकेरी हिलचे संरक्षण होईल, शिवाय पर्यटनामुळे सरकारला महसूल मिळेल.

सरकारने भाडेपट्टी करार करून, या सिकेरी हिलवर ८८ खोल्यांचे पंचतारांकित हॉटेल व क्लब हाऊस आणण्याचा घाट घातला आहे. कांदोळी येथील सर्व्हे क्र. ९६/० मधील ३ लाख चौरस मीटर जागा ही पंचतारांकित हॉटेल उभारण्याचे सरकारचे प्रयत्न असून, ५० वर्षे व अधिक २४ वर्षांसाठी हा करार आहे. अंदाजे ६५ कोटींचे हे करारपत्र आहे. तसेच, सरकारने इतर संबंधित विभागांना बजावले आहे की, या प्रकल्पासाठी प्रत्येक अर्जाला तत्काळ मंजुरी द्यावी, असा दावा दिवकर यांनी यावेळी केला.

लवकरच ‘सेव्ह सिकेरी’ चळवळ

कांदोळी पंचायतीकडे हा विषय मांडला असून कुठल्याही परिस्थितीत या प्रकल्पाला पंचायतीकडून हिरवा कंदिल मिळणार नाही, असे आश्वासन सरपंचांनी फोमरला दिले आहे. फोरमकडून उभारल्या जाणाऱ्या लोक लढ्याला स्थानिक पंचायत पाठिंबा देणार, अशी ग्वाही सरपंचांनी दिल्याचा दावा दिवकर यांनी केला. लवकरच आम्ही ‘सेव्ह सिकेरी फॉर नेक्स्ट जनरेशन’ ही चळवळ सुरू करणार असल्याचे दिवकरांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com