पंचायतीच्या सदस्याला एवढाही मान जिल्‍हा पंचायत सदस्‍यांना नाही! दक्षिण गोवा ZP उपाध्‍यक्षांचा राजीनामा

South Goa Zilla Panchayat: वेळीप यांनी 18 सप्टेंबर रोजी जि.पं. उपाध्‍यक्षपदाचा राजीनामा दक्षिण गाेव्‍याच्‍या अध्‍यक्ष संजना वेळीप यांच्‍याकडे सुपूर्द केला.

मडगाव: सध्‍याच्‍या प्रशासकीय प्रणालीत पंच सदस्‍याला जेवढा मान आहे, तेवढाही जिल्‍हा पंचायत सदस्‍यांना नाही. जिल्‍हा पंचायत सदस्‍यांच्‍या अखत्‍यारित चार ते पाच पंचायती येत असतानाही कुठल्‍याही कार्यक्रमांना त्‍यांना बोलावले जात नाही. वास्‍तविक सरकारी शिष्‍टाचार पद्धतीत जिल्‍हा पंचायत सदस्‍यांनाही सामावून घेण्‍याची गरज आहे, अशी खंत दक्षिण गोवा जिल्‍हा पंचायतीचे उपाध्‍यक्ष कुशाली वेळीप यांनी आज व्‍यक्‍त केली.

वेळीप यांनी 18 सप्टेंबर रोजी जि.पं. उपाध्‍यक्षपदाचा राजीनामा दक्षिण गाेव्‍याच्‍या अध्‍यक्ष संजना वेळीप यांच्‍याकडे सुपूर्द केला. पक्षाच्‍या आदेशानुसार आपण हा राजीनामा दिला आहे. उपाध्‍यक्ष म्‍हणून आपण पदाला न्‍याय देण्‍याचा पुरेपूर प्रयत्‍न केला, असेही त्‍यांनी सांगितले. वेळीप हे बार्से मतदारसंघातून जिल्‍हा पंचायतीवर निवडून आले होते. पक्षाने आपले नाव उपाध्‍यक्ष पदासाठी मंजूर केले आणि या पदावर काम करण्याची आपल्‍याला संधी दिली याबद्दल आपण पक्षाच्‍या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

सरकारने जिल्‍हा पंचायत सदस्‍यांना विकासकामांसाठी निधी वाढवून दिला. मात्र त्‍यांना त्‍यांचे अधिकार देण्‍यास सगळीच सरकारे अपयशी ठरली आहेत. निवडून आलेल्‍या आमदारांना जिल्‍हा पंचायत सदस्‍य नकोसे वाटतात. कारण जिल्‍हा पंचायत सदस्‍य हे पुढे त्‍यांचे प्रतिस्‍पर्धी होऊ शकतात, या भीतीने त्‍यांना घेरलेले असते. त्‍यामुळेच असेल कदाचित निवडून आलेल आमदार जिल्‍हा पंचायत सदस्‍यांना त्‍यांचे अधिकार देण्‍यास फारसे उत्‍सुक नसतात, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

वेळीप हे तीनवेळा जिल्‍हा पंचायत सदस्‍य म्‍हणून निवडून आले आहेत. ते म्‍हणाले, जिल्‍हा पंचायत सदस्‍यांना विकासकामांसाठी मिळणारा निधी कमी असतानाही आहे त्‍या निधीतून चोख रितीने काम करण्‍यावर त्‍यांचा भर असतो. बाकीच्‍या ठिकाणी ज्‍या कामाला २५ लाखांचा खर्च येतो तेच काम जिल्‍हा पंचायत सदस्‍य पाच लाखात क़रुन दाखवतात. जिल्‍हा पंचायत सदस्‍यांना त्‍यांचे अधिकार दिले तर ते चांगले काम करुन दाखवू शकतील, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com