सावरकर हिंदुत्ववादी, पण प्रखर विज्ञाननिष्ठ! ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन’ ग्रंथाचे डिचोलीत प्रकाशन..

Savarkar Vichardarshan Book: सावरकर हे सगळ्यांनाच पचण्यासारखे नव्हते, असे परखड विचार ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी मांडले.

डिचोली: स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञाननिष्ठ, साहित्यिक, भाषाप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ म्हणून ओळखले जात असले, तरी स्वातंत्र्यलढ्यातील वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणूनही पाहिले जाते. मात्र त्या अनुषंगाने अभ्यास झालेला नाही. सावरकर हे सगळ्यांनाच पचण्यासारखे नव्हते, असे परखड विचार ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी मांडले.

सावरकरांची विज्ञाननिष्ठा इतकी प्रखर होती, की आजच्या राजकीय हिंदुत्वासंदर्भात अनेकांना ती पटणार नाही. सावरकर यांचे गांधीसंबंध आणि टिळकांविषयीचे त्यांचे विचार अजून पुढे आलेले नाहीत, सावरकर जर आज हयात असते, तर भारतीय संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या ज्या घटना घडत आहेत, त्या त्यांनी सहन केल्या नसत्या.

अलिकडेच घडलेल्या हडफडे येथील अग्निकांडप्रकरणी त्यांनी नव्याने मुक्तीलढ्याची हाक दिली असती, असेही राजू नायक यांनी सांगून, दिवंगत पंतप्रधान वाजपेयी यांनी सावरकर यांच्याबद्दल लोकसभेत केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या निवडक लेखनाचा समावेश असलेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन’ या ग्रंथ-खंडांच्या प्रकाशन सोहळ्यात राजू नायक सन्माननीय अतिथी या नात्याने बोलत होते. पुणे येथील ‘हर घर सावरकर समिती’च्या सहकार्याने भारत विकास परिषदतर्फे डिचोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज सरकारी शाळा संकुल सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

‘सकाळ’समूहातर्फे या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे या नात्याने आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, विशेष अतिथी म्हणून आमदार प्रेमेंद्र शेट तर स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शक ग्रंथ संचाचे संपादक सात्यकी सावरकर प्रमुख वक्ते या नात्याने उपस्थित होते. अन्य मान्यवरांत नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, भारत विकास परिषदेचे राजेंद्र सावईकर आदींचा समावेश होता.

डॉ. चंद्रकांत शेट्ये व प्रेमेंद्र शेट यांनी सावरकर यांच्या विचारांची आज समाजाला गरज आहे, असे मत व्यक्त केले. दुर्वा नार्वेकर या मुलीने म्हटलेल्या ‘वंदे मातरम्’ने सोहळ्याची सुरवात झाली. प्रा. डॉ. प्रवीण सावंत यांनी स्वागत तर राजेंद्र सावईकर यांनी प्रास्ताविक केले. संजय सालेलकर यांनी मान्यवरांचा परिचय केला. श्रद्धा धोंड (शेट्ये) यांनी सूत्रसंचालन केले. तर संजय नाईक यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सोहळ्याचा समारोप झाला. कार्यक्रमस्थळी ग्रंथखंडांची सवलतीत विक्री करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com