पणजी: ‘जे निर्भीडपणे व पोटतिडकीने लोकांचे प्रश्न मांडतात, जे सरकारला योग्य दिशा देतात, अशा पत्रकारांच्या, वर्तमानपत्रांच्या मागे लोकांनी खंबीरपणे उभे राहायला हवे’, असे आवाहन गोमन्तकचे संपादक-संचालक राजू नायक यांनी केले.
गोवा मराठी पत्रकार संघातर्फे आज नायक यांना ‘गोमन्तक’चे माजी संपादक (स्व.) माधवराव गडकरी पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आले; तर ज्येष्ठ संपादक परेश प्रभू यांना (स्व.) द्वा. भ. कर्णिक पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट, ‘आयएमबी’चे अध्यक्ष दशरथ परब, विठ्ठल पवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष गुरुनाथ नाईक, साहित्यिक रमेश वंसकर व्यासपीठावर उपस्थित होते.
नायक पुढे म्हणाले, ‘गोमन्तक’मध्ये दाखल झाल्यानंतर माधवराव गडकरी यांनी गोव्याच्या पत्रकारितेला दिशा दिली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकीय हाराकिरीविरोधात मी कायम उभा राहिलो. मूल्याधिष्ठित पत्रकारितेच्या बळावर चाळीस वर्षे मार्गक्रमणा केली. गडकरींच्या नावे मिळालेला पुरस्कार नम्रतापूर्वक स्वीकारतो.
नायक यांनी सामाजिक अंतरंग, बदलते राजकीय संदर्भ, विचारवंतांची खंत आदी मुद्यांवर सोदाहरण प्रखर भाष्य केले.
खाण, पर्यटन क्षेत्रांमधील विसंगती अधोरेखित करून त्यांनी पत्रकारांनी धाडस दाखवण्याचे आवाहन केले.
सामाजिक अभिसरणावर बोट ठेवताना वाचकांची जबाबदारी व आवश्यक जन दबावाचे महत्त्व उलगडले.
कुणाचाही मुलाहिजा न बागळता गोव्याच्या उन्नयनासाठी मांडलेली परखड मते ऐकून उपस्थित भारावले, साऱ्यांनी उभे राहात टाळ्यांच्या गजरात नायक यांच्या संबोधनाला दाद दिली.
सरकार, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता या चारही स्तंभांनी एकमेकांच्या हातात हात घालून किंबहुना वेळप्रसंगी एकमेकांच्या समोर उभे ठाकून काम केले तर गोव्याच्या प्रगतीला वेळ लागणार नाही. लहानपणी मी गडकरी तसेच स्व. द्वा. भ. कर्णिक यांचे अग्रलेख वाचायचो. गडकरींचे भाषण ऐकण्यासाठी सभांना उपस्थिती लवायचो, असे मंत्री शिरोडकर यांनी संबोधित केले.
ज्येष्ठ संपादक परेश प्रभू यांनी द्वा. भ. कर्णिक यांच्या कार्याला उजाळा दिला. विचारवंत संपादकांची परंपरा आणि सद्यस्थितीमधील पत्रकारितेचा प्रवाह यावर त्यांनी अल्पाक्षरी मात्र प्रत्ययकारी भाष्य केले. सामाजिक उत्थानासाठी कार्यरत पत्रकारांना कौतुकाची थाप हवीच, त्याद्वारे प्रेरणा मिळते. त्याचप्रमाणे पत्रकारांनी आपल्या आचरणातून, लेखणीतून विश्वासार्हता जपली पाहिजे, असे प्रभू यांनी सांगितले.
‘पत्रकार ही शक्ती, तर पत्रकारिता ही धार आहे. विधायक पत्रकारितेचे कौतुक करणे गरजेचे आहे. आजची युवा पिढी ही डिजिटल युगात मोबाईलच्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या वाचते; परंतु त्यात कितपत सत्यता असते, हे पडताळणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे वृत्तपत्रांचे वाचन करणे काळाची गरज आहे’, असे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.