VIDEO: मडगाव रेल्वेस्थानक परिसरात एफडीएची धडक कारवाई; 408 किलो मांस जप्त

408 kg Meat Seized in Margao: मडगाव रेल्वेस्थानक परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुरुवारी पहाटे विशेष तपासणी मोहीम राबवून ४०८ किलो मांस जप्त केले.

मडगाव: मडगाव रेल्वेस्थानक परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुरुवारी पहाटे विशेष तपासणी मोहीम राबवून ४०८ किलो मांस जप्त केले. जप्त केलेल्या मांसाची एकूण किंमत १ लाख ८३ हजार रुपये आहे.

दक्षिण गोव्याचे अभिहित अधिकारी संज्योत कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. रेल्वेतून उतरवून मांसाची वाहतूक केली जात असताना एफडीएच्या पथकाने दोन संशयास्पद वाहने ताब्यात घेतली.

एका ओम्नी कारमधून ५८ किलो मांस जप्त करण्यात आले. हे मांस ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता दिल्लीहून रेल्वेने पाठवण्यात आले होते. ते ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता मडगाव रेल्वेस्थानकावर पोहोचले. रेल्वे प्लॅटफॉर्मवरून मडगावमधील किरकोळ विक्रेत्यांना वितरित करण्यासाठी हे मांस ओम्नी कारमध्ये भरले जात असतानाच अधिकाऱ्यांनी कारवाई केली.

दुसऱ्या महिंद्रा कॅरियर वाहनातून पाच बॉक्स जप्त करण्यात आले. त्यात ३५० किलो मांस होते. या मांसाच्या वाहतुकीसाठी आवश्यक पशुवैद्यकीय प्रमाणपत्र, खरेदीचे बिल किंवा पावती तसेच वैध वाहतूक परवाना नसल्याचे तपासणीत आढळून आले. या कारवाईत वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी माधव व प्रिया, अन्न सुरक्षा अधिकारी अमरदीप तसेच एफडीए कर्मचारी गौरेश व दुमीन सहभागी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com