Vishwajit Rane At Bicholim Health Camp
डिचोली: सरकारला जनतेच्या आरोग्याची काळजी आहे. त्यासाठी रुग्णांना वेळीच आणि चांगली सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आपत्कालीनवेळी रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत. यासाठी आरोग्य क्षेत्रात ‘हेलिकॉप्टर’ सेवा सुरू करणे गरजेचे आहे, असे मत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त करून डिचोली तालुका दत्तक घेण्याची घोषणा केली.
डिचोली येथे आयोजित मेगा आरोग्य शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आरोग्य खात्याच्या संचालक गीता नाईक, ‘गोमेकॉ’चे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, दंत महाविद्यालयाच्या डीन डॉ. आताईद आणि डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. सिद्धी कासार उपस्थित होत्या.
आरोग्य खात्यातर्फे डिचोलीत आयोजित केलेल्या शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात गोवा दंत आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी कर्क, मधूमेह, दंतचिकित्सा आदी विविध आजारांची तपासणी केली. या शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. डॉ. सिद्धी कासार यांनी आभार मानले. या शिबिरावेळी जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, डिचोलीचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर अन्य नगरसेवक तसेच विविध पंचायतीचे सरपंच आणि पंच उपस्थित होते.
सध्या ‘मधुमेह’ हा जीवघेणा आजार बळावत चालला आहे. त्याबद्दल आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी चिंता व्यक्त केली. ‘मधूमेह’ आजाराचा प्रतिकार करून रुग्णांची जीवनशैली बदलून त्यांना या आजारातून पूर्णपणे सुरक्षित कसे ठेवता येईल यासाठी आरोग्य खात्यातर्फे अभ्यासपूर्ण विशेष उपचारपद्धत सुरू करणार आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळवून देण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राणे यांनी जाहीर केले.
जनतेला वेळीच आणि चांगली आरोग्य सेवा मिळावी. यासाठी १० कार्डियाक मिळून ८५ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी सरकारकडे करणार आहे. ‘सेटलाईट ओपीडी’ सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, असे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.
राज्यातील पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेताना, पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवन सुरक्षित रहावे यासाठी पत्रकारांसाठी मोफत आणि तातडीची आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास मुंबईसारख्या राज्यातही त्यांच्यावर उपचार करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राणे यांनी जाहीर केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.