Gomantak Coffee Club: गोमन्तकच्या कॉफी क्लबमध्ये 'पुरुष' नाटकातील कलाकारांशी खास संवाद...

Purush Play Team Goa: जयवंत दळवी यांच्या अनेक नाटकांमधून ‘पुरुष’ नाटक का निवडले या पहिल्याच प्रश्नाचे उत्तर देताना शरद पोंक्षे म्हणाले, 'दुर्दैवाने हा विषय आजही कालबाह्य झालेला नाही.

पणजी: जयवंत दळवीनी लिहिलेले 'पुरुष' नाटक आज जर सेन्सॉरकडे गेले असते तर त्यातील काही संवादांमुळे विविध समाज दुखावले जातील असे कारण देऊन सेन्सॉरने ते नाटक ऐंशी टक्के कापले असते.‌ मात्र या नाटकाचे आजपर्यंत ४५ प्रयोग होऊनदेखील या नाटकातील वाक्यांमुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्याचे निमित्त सांगून अजून कुणीच भांडायला आलेला नाही. सामान्य माणसाला त्याबद्दल काही पडलेले नसते तर राजकारणी अशा गोष्टींचा उपयोग आपल्या फायद्यासाठी करून घेत असतात. सामान्य माणूस आणि राजकारणी यातील फरक  काय असतो हे या नाटकाने दाखवून दिले आहे' असे रोखठोक विधान दैनिक गोमन्तकच्या 'कॉफी क्लब' कार्यक्रमात या नाटकातील प्रमुख अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. 

जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मोरया, भूमिका आणि अथर्व या संस्थांनी मिळून पुनर्निर्मिती केलेल्या 'पुरुष' या नाटकातील अभिनेते आणि निर्माते यांनी दैनिक गोमन्तकच्या ‘कॉफी क्लब’ मध्ये भाग घेऊन रसिकांशी संवाद साधला. या नाटकाची पुनर्निर्मिती आणि त्यातील पात्रांचे कंगोरे या संबंधाने त्यांनी आपापली मते यावेळी रसिकांसमोर मांडली. या नाटकातील अभिनेते शरद पोंक्षे, अविनाश नारकर, स्पृहा जोशी, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर आणि नेहा परांजपे तसेच निर्माते श्रीकांत तटकरे यांनी या कार्यक्रमात रसिकांशी संवाद साधला. डॉ.  अजय वैद्य यांनी प्रश्न विचारून त्यांना बोलते केले. 

जयवंत दळवी यांच्या अनेक नाटकांमधून ‘पुरुष’ नाटक का निवडले या पहिल्याच प्रश्नाचे उत्तर देताना शरद पोंक्षे म्हणाले, 'दुर्दैवाने हा विषय आजही कालबाह्य झालेला नाही. उलट ज्या काळात ते नाटक लिहिले गेले त्यापेक्षा आज परिस्थिती अधिक भयंकर आहे. आज स्त्रिया सुरक्षित नाही ही परिस्थिती तर आहेच पण त्याशिवाय समाजातील जातीभेद/जातीद्वेष हा विषयही या नाटकात जयवंत दळवी यांनी खुलेपणाने मांडला आहे. समाजाला आरसा दाखवणारा हा विषय आहे व त्यामुळेच हे नाटक आम्हाला करावेसे वाटले.' 

शरद पोंक्षे यांच्या या उत्तराशी सहमत होताना स्पृहा जोशी,  अविनाश नारकर या अभिनेत्यांनीही आजच्या काळाशी या नाटकाच्या असलेल्या सुसंगतेबद्दल आपली मते व्यक्त केली.  हे नाटक जयवंत दळवी यांनी कसे बांधिव आणि नेटके रचले आहे हे सांगताना, अशी नाटके आणि अशा भूमिका पुन्हा पुन्हा लिहिल्या जात नाहीत हे स्पृहा जोशी यांनी स्पष्ट केले. 'या नाटकातील अंबिकेची भूमिका स्वीकारताना, एक अभिनेत्री म्हणून करिअरच्या टप्प्यावर आपण कुठे आहोत हे शोधायला ही भूमिका मला मदत करेल असा विचार मी केला. अशा तगड्या भूमिकेला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे हे नाटक करावे की नको अशी शंका मला कधीच नव्हती.' असे त्या पुढे म्हणाल्या.  

या नाटकातील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अविनाश नारकर यांनी, 'तालमीत इतर कलाकारांबरोबर मिळून नाटकाचा सराव करताना भूमिकेचे कंगोरे मिळून जातात' हे महत्त्वाचे विधान करताना आपण 'तालमीचा नट' आहे हे स्पष्ट केले. या नाटकाच्या तालमी ४० ते ४५ दिवस चालल्या, जी अलीकडील काळात दुर्मिळ झालेली बाब आहे. 'सर्वसामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करणारी आपली भूमिका असली तरी हे पात्र एका विशिष्ट क्षणी शरीराने, विचाराने, सोसण्याने पेटून उठते.' ही त्या पात्राची अचूक खोच त्यांनी आपल्या बोलण्यामधून उलगडली. 

जयवंत दळवी यांनी ८० च्या दशकात लिहिले होते. आज ४० वर्षानंतर आजही हे नाटक समाजातील परिस्थितीला लागू ठरणारे आहे. अशा या नाटकाबद्दल, त्यातील भूमिकांबद्दल आणि त्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांच्या विचार प्रक्रियेबद्दल जाणून घेण्यासाठी 'कॉफी क्लब'मध्ये रसिकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com