मुलींचे शोषण करणाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी!

Goa Crime: गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हायला हवी, असे मत मानसोपचार तज्ज्ञ सुलक्षा गावस यांनी व्यक्त केले.

पणजी: ज्यावेळी आपल्या वाहनाला इतर वाहनांची धडक बसून एक ओरखडा आला तरी आम्ही त्यांच्याविरोधात जोरजोरात भांडण करतो. परंतु ज्यावेळी कुडचडे येथे अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होते, त्यांचे शरीर ओरबाडले जाते, त्यावेळी आम्ही समाज म्हणून गप्प का बसतो ? अशा कृत्यांविरोधात आवाज उठविणे गरजेचे असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हायला हवी, असे मत मानसोपचार तज्ज्ञ सुलक्षा गावस यांनी व्यक्त केले.

‘गोमन्तक टीव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात समाजसेविका आवदा व्हिएगस याही सहभागी झाल्या होत्या. दरम्यान गवस म्हणाल्या, काहीवेळी मुलांचे केलेले अति लाड हे देखील बिघडवत असतात. मुलं मागतात, त्या सर्व गोष्टी पुरविणे म्हणजे पालकत्व नसून त्यांना नैतिक मूल्य आणि मर्यादांची जाणीव करून देणे हे देखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासनाने संवेदनशील व्हावे!

‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत अल्पवयीन मुलांवर लिंग विरहित कोणावरही अत्याचार झाल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे, परंतु आजपर्यंत राज्यात अशा प्रकरणातून पुराव्या अभावी आरोपी सुटतात. ज्यावेळी पीडित व्यक्तीला वैद्यकीय तपासणीसाठी नेले जाते. त्यावेळीची प्रक्रिया अजूनही क्लिष्ट आहे. चाचणीसाठी थेट गोमेकॉत पाठविले जाते. या प्रकारात संपूर्ण दिवस जातो.जर ही व्यक्ती अल्पवयीन असेल तर या प्रक्रियेचा परिणाम त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर होतो, त्यामुळे अशा प्रक्रियेत प्रशासनाने देखील काही प्रमाणात संवेदनशील होणे गरजेचे असल्याचे आवदा व्हिएगस यांनी सांगितले.

गरीब घरातील मुली बळी

कुडचडेत जो प्रकार घडला ते सेक्स स्कॅण्डल नव्हे तो लैंगिक अत्याचार आहे. गरीब घरातील सुंदर अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात अडकवत, त्यांना फूस लावून त्यांचे शोषण करण्याचा हा प्रकार आहे. या प्रकरणातील अनेक पालक आपल्या मुलींना समोर आणत नाही आहेत. कारण मुलीचे नाव बदनाम होईल, समाजात चर्चा होईल या भीतीने समोर येत नाहीत परंतु अशा नराधमांना जर शिक्षा दिली, तरच समाजात एक संदेश जाईल. ज्या अल्पवयीन मुलींचे ज्याने शोषण केले त्याला शिक्षा देण्यासाठी, न्याय मिळविण्यासाठी मुलींच्या पालकांनी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे, असे आवदा व्हिएगस यांनी सांगितले.

बदनामीच्या भीतीने मौन

शांत, सुंदर गोवा असे आपल्या राज्याला संबोधले जाते. परंतु येथे अशा प्रकारचा लैंगिक प्रकार समोर येऊन खदखदणारा लाव्हा समोर आला आहे. अशा प्रकरणात पीडित व्यक्ती भीतीमुळे, बदनामीमुळे या प्रकारांना वाचा फोडण्याऐवजी मौन बाळगणे पसंत करते. काहीवेळी लग्नाचे आश्‍वासन दिले जाते. काहीवेळी गोड बोलण्याला, माया लावण्याच्या प्रकाराला भाळतात आणि अशा प्रकारच्या लैंगिक शोषणाला बळी पडतात. ज्या व्यक्तीला एखादी व्यक्तीसोबत संबंध ठेवायचे असतात ते त्या व्यक्तींवर सहा-सहा महिने डोळा ठेवून असतात, ती व्यक्ती कुठे जाते, काय करते याकडे बारीक लक्ष असते. त्यामुळे हे प्रकार आकस्मित घडतात, असे होत नसल्याचे गावस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com