Sadetod Nayak: शहरांमध्ये इमारत मजले वाढविण्याची परवानगी द्या! ख्‍यातनाम बांधकाम व्‍यावसायिकांचे मत

Sadetod Nayak Interview: आज गोव्यात प्रत्येक प्रकल्पाला विरोध होत आहे; परंतु हा प्रकार चुकीचा आहे. आज गावातील लोक कामानिमित्त शहरात येतात.

पणजी: आज गोव्यात प्रत्येक प्रकल्पाला विरोध होत आहे; परंतु हा प्रकार चुकीचा आहे. आज गावातील लोक कामानिमित्त शहरात येतात. त्यामुळे त्यांना शहरात राहण्यासाठी फ्लॅट हवेत. त्यामुळे शहरांमध्ये इमारतीचे मजले वाढविण्यासाठी परवानगी दिल्यास व इमारतीच्या रिडेव्‍हलपमेंटसाठी अधिसूचना काढल्यास गावांमध्ये मोठ्या प्रमाणात इमारती येणार नाहीत, असे प्रतिपादन गोमंतकीय बांधकाम व्‍यावसायिक राजेश तारकर यांनी केले.

‘गोमन्तक टीव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात तारकर बोलत होते. या कार्यक्रमात बिल्डर राजेश शेट आणि आर्किटेक्ट ब्रायन सुवारीस यांनी सहभाग घेतला. दरम्यान, तारकर म्हणाले, राज्यात जो प्रकल्पांना विरोध होतो त्यांचे एक कारण म्‍हणजे बांधकामासाठी डोंगर कापले जाऊ लागले. शेती पुरली जाऊ लागली. पूर्वी हे प्रकार घडत नव्हते.

ज्यावेळी एखादा प्रकल्प येतो, त्यावेळी त्याचे फायदे-तोटे समजून न घेता विरोध करणे चुकीचे आहे. आज जगाच्या तुलनेत स्पर्धेत उतरण्यासाठी साधनसुविधा उभारणे गरजेचे आहे. २०११ साली प्रादेशिक आराखडा तयार झाला होता. आता पंधरा वर्षे झाली, या काळात देश बदलला आहे. त्यामुळे आजच्या स्थितीला आवश्‍यक असे कायदे बनविणे गरजेचे आहे; अन्यथा अवैध पद्धतीने लोक बांधकामे करतील. सरकारने पारदर्शकपणे जनतेला विश्‍वासात घेऊन कायदे बदलणे, प्रकल्प उभारणे गरजेचे असल्याचे मत राजेश शेट यांनी व्यक्त केले.

मेगा प्रकल्‍पांचा गुंता सुटायलाच हवा!

दिल्लीतील नागरिक गोव्यात फ्लॅट खरेदी करतात ते गोव्यात फ्लॅट स्वस्त मिळतात म्हणून नव्हे. ते इतर राज्यांतही मिळू शकतात; परंतु ते गोव्यात फ्लॅट खरेदी करतात; कारण त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात राहायचे असते.

आज गोव्यातील नागरिक गोव्यात राहावेत, तरुणाईच्या हातांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. आज आयटी, इलेक्ट्रॉनिक सारख्या क्षेत्रातील अभियंत्यांसाठी गोव्यात काहीच संधी नाहीत, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे.

त्यामुळे सरकार आणि बिल्डर आणि नागरिक यांच्या सहभागातून हा मेगा प्रकल्प आणि जागेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत राजेश शेट यांनी मांडले.

ब्रायन सुवारीस म्‍हणाले...

म्‍हणून लोकांच्‍या मनात भीती : आम्ही हे लक्षात घ्यायला हवे की, आपल्याला फार्मासाठी लागणारे कामगार, विचारवंत, तज्ज्ञ आणि परप्रांतीय कामगार गोव्यात येणार आहेतच; त्यामुळे त्यांना राहण्यासाठी घरे ही हवीच. विकास हा पाण्यासारखा असतो. त्याला जर नियोजनबद्धपणे हाताळला नाही तर विखुरला जाईल. त्यामुळे कोणत्याही प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज मेगा प्रकल्प ही संकल्पना वापरली जात आहे, जे चुकीचे आहे. परंतु हेदेखील लक्षात घेतले पाहिजे की, आज स्थानिकांना या प्रकल्पांमुळे वीज, पाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे अजून जर लोक वाढले तर अजून संकट येईल, अशी नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाल्याचे ब्रायन सुवारीस यांनी सांगितले.

शहरांचे नियोजन बिघडले : एकेकाळी म्हापसा मार्केट हे सर्वोत्तम होते; परंतु आज स्थिती बिघडली आहे. वास्को, म्हापसा, पणजी आणि मडगाव या शहरांतील अनेक इमारती या नव्याने बांधणे आवश्‍‍यक आहेत. मात्र, या शहरांत सांडपाण्याची मोठी समस्या उद्भवत आहे. टोंका येथे सांडपाणी प्रकल्प बांधून तयार आहे; परंतु तो सुरू केलेला नाही. तर दुसरीकडे बिल्डरनादेखील ही सुविधा तयार करून द्यावी लागते. या सगळ्याचा परिमाण म्हणून फ्लॅटचे दर वाढतात, याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, असेही ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com