Sadetod Nayak: गोंयकारपण जपण्यात आम्ही अपयशी, सडेतोड नायक कार्यक्रमात खंत

Sadetod Nayak Interview : गोमंतकीय संस्कृती, परंपरा जपण्यात आम्ही अपयशी ठरत असल्याची खंत इतिहास अभ्यासक संजीव सरदेसाई यांनी व्यक्त केली.

पणजी: ज्यावेळी आम्ही गोवा आणि ‘गोंयकारपण’ म्हणून सिंहावलोकन करतो त्यावेळी आम्हाला आमच्या अधिकारांची जाणीव आहे, परंतु आपल्या जबाबदाऱ्या विसरतो. गोमंतकीय संस्कृती, परंपरा जपण्यात आम्ही अपयशी ठरत असल्याची खंत इतिहास अभ्यासक संजीव सरदेसाई यांनी व्यक्त केली. ते ‘गोमन्तक टीव्ही’ वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात बोलत होते. या चर्चासत्रात फा. व्हिक्टर फेर्राव, प्रा. युगांक नायक व मच्छिंद्र कांबळी यांनी सहभाग घेतला होता.

युगांक नायक म्हणाले, गोव्यात कोणतीही नवी गोष्ट यायची म्हटले की, त्याला विरोध व्हायचा. आम्ही आमची सांस्कृतिक संवेदनशीलताच विसरलो आहोत.

महाराष्ट्रवादामुळे कोकणी-मराठी करत आम्ही एकमेकाची टाळकी फोडत बसल्याने आम्ही आमची संस्कृती आणि अस्मिता ज्या पद्धतीने पुढे न्यायला हवी होती, ती नेण्यात कमी पडलो

आहोत. गोवा मुक्तीची पहिली चार-पाच वर्षे सोडली तर नंतर सदोदित राजकीय अस्थिरता पाहायला मिळाली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या कटकारस्थानामुळे अनेक समस्या उद्भवल्या हे मान्य करावे लागेल. आम्हीही मराठीप्रेमी आहोत परंतु आम्हाला महाराष्ट्रवाद मान्य नाही.

भाषा हा मुद्दाच असता कामा नये

आम्ही अनेक वर्षांच्या पारतंत्र्यातून मुक्त झालो, स्वतःचे प्रशासन निवडायला अधिकार मिळाला, परंतु आम्ही आमची संस्कृती, अस्मिता टिकविण्यासाठी नेमकी पावले उचलायला कमी पडत असल्याचे संजीव सरदेसाई यांनी सांगितले. माझ्या मते, भाषा हा कधी मुद्दाच असता कामा नये. आम्ही जो समाजापर्यंत विचार मांडायला हवा होता त्याचे माध्यमच चुकले. महाराष्ट्र विलीनीकरणाचा मुद्दा हा आम्ही मुक्त होण्यापूर्वीपासून चालत आला होता. खरेतर, ख्रिस्ती आणि हिंदू समाज जो गुण्यागोविंदाने नांदत होता त्याला तडा हा जनमत कौलामुळे गेला आहे.

मुक्तीनंतरचा जनमत कौलाचा विचार घातकी

गोव्याची उत्पत्ती कशी झाली, पोर्तुगीज येण्यापूर्वी आणि नंतरचा गोवा यांच्या सीमा वेगळ्या आहेत. गोव्याची कागदोपत्री ठरविलेली सीमा आज अस्तित्वात आहे. मुक्तीनंतर जो जनमत कौलाचा विचार मांडला तो घातकी ठरला. त्यामुळेच आज अस्तित्वाचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. १९८७ पासून आजपर्यंत जी काही मराठीला राजभाषा करा म्हणून आंदोलने झाली त्यात मराठीप्रेमींनी कधीही कोकणीला विरोध केलेला नसल्याचे मत मच्छिंद्र च्यारी यांनी व्यक्त केले.

गावकरी परंपरा विसरलो

ज्यावेळी आम्ही गोंयकारपण किंवा गोवा हा विचार म्हणतो त्यावेळी त्याला भौगोलिक सीमा आहेत आणि नाहीत देखील. आमच्याकडे पूर्वीपासून आपला गाव सांभाळण्यासाठी गावकारी पंरपरा होती, परंतु ती आम्ही आज विसरत चाललो आहोत. आपल्या गावचे निर्णय सर्व गाव मिळून घ्यायचा, परंतु आज चित्र वेगळे आहे. आम्ही आमची संस्कृती जपण्यात आणि राजकीय नेतृत्व देण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेलो आहे. आम्ही ख्रिस्ती, हिंदू, मराठी- कोकणी अशा वादांमध्ये अडकून पडलोय आणि आपले खरे उद्दिष्ट हरवत चाललो असल्याचे मत फा. व्हिक्टर फेर्राव यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com