Cyber Crime: गुंतवणुकीच्या आमिषाने 67 लाखांची फसवणूक, केरळमधून युवकाला अटक

Goa Cyber Crime: शेअर मार्केट आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अनुराग आर. (तिरुवनंतपुरम, केरळ) याला अटक केले.

शेअर मार्केट आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा सायबर क्राईम पोलिसांनी केरळमधून अनुराग आर. (तिरुवनंतपुरम, केरळ) याला अटक केले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे इतर राज्यांशीही जोडलेले असल्याचे देखील तपासात समोर आल्याने त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ डिसेंबर २०२५ रोजी करंझाळे येथील एका रहिवाशाने सायबर क्राईम पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. तक्रारीनुसार १ ते २४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ''पिहू अर्बन लेदर'' या नावाने संशयिताने व्हॉट्सॲपवरून संपर्क साधून, एका नामांकित गुंतवणूक फर्मचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर डीप जिपीटी ग्लोबल इटीएफ इन्वेस्टमेंट नावाच्या बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे जास्तीचा परतावा मिळवून देण्याचे आमिष त्यांनी दाखविले होते. दरम्यान त्यांनी तक्रारदाराला ६७ लाख रुपये गुंतवण्यास भाग पडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

सायबर पोलिसांनी तपास केला असता, फसवणुकीच्या रकमेपैकी २८ लाख रुपये अनुराग आर. याच्या बँक खात्यात जमा झाल्याचे आढळले. ही रक्कम नंतर त्याच्या इतर साथीदारांच्या खात्यात वळवण्यात आली होती. गोव्याच्या तपास पथकाने तिरुवनंतपुरम गाठून संशयिताला बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे, संशयिताचे हे बँक खाते केवळ गोव्यातच नव्हे, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये नोंदवलेल्या इतर चार सायबर गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या खात्याद्वारे आतापर्यंत एकूण ५४.४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सायबर क्राईम पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेरविन डीकोस्टा, एएसपी बी.व्ही. श्रीदेवी आणि पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

Cyber Crime
online investment fraud arrested
Digital Arrest Fraud Case Goa
Goa Cyber Crime
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com