Datta Naik Felicitating Ceremony With Shashi Tharoor
सासष्टी: सध्या देशात धार्मिक मूलतत्त्ववाद वाढलेला आहे. केंद्रात व राज्यातही याची अनेक उदाहरणे देण्यासारख्या घटना घडत आहेत. त्यामुळे आपण खिन्न झालो असलो तरी देशात त्या विरोधात लढा देण्याइतपत ताकदीच्या शक्ती आहेत. त्यामुळे आपण आशावादी आहे. अशा धार्मिक मूलतत्त्ववादी राज्यकर्त्यांना पदच्युत करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन उद्योजक, साहित्यिक तथा समाजसेवक दत्ता दामोदर नायक यांनी सत्काराला उत्तर देताना केले.
दत्ता नायक यांनी वयाची ७० पूर्ण केल्यानिमित्त रविवारी दक्षिणायन आणि नागरी संस्थांतर्फे भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय संस्कृती ही एकवचनी नसून बहुवचनी आहे. भारतात ‘मी’ पेक्षा ‘आम्ही’ या शब्दाला जास्त महत्त्व आहे, असे नायक म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, यापुढील आपली दहा वर्षे सुपीक असतील. मी साहित्य, सामाजिक व राजकीय त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात जास्त सक्रिय असेन.
दत्ता नायक यांनी सांगितले की, हा सत्कार आपला वैयक्तिक नसून तो गोव्याच्या पुनर्जागरणाच्या, खऱ्या मूल्यांची खात्री पटलेल्या व्यक्तीचा आहे. त्यांनी कुटुंबीयांचे, उद्योग समूहातील, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे, मित्र मंडळींप्रति कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर कळत किंवा नकळत ज्यांना आपण दुखावले, त्यांची क्षमा मागितली व ज्यांनी आपल्याला दुःख दिले, त्यांना माफ केल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या जीवनाचे तत्त्वज्ञान स्पष्ट केले. आपल्या आईने प्रागतिक विचारांचे संस्कार दिल्याचे ते म्हणाले.
लेखक व दक्षिणायन अभियानाचे संस्थापक डॉ. गणेश देवी यांनी दत्ता हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट यांनी दत्ता नायक यांच्या साहित्याचा आढावा घेतला. दत्ता यांनी आता पोर्तुगीज भाषेतही लेखन करावे, असा सल्ला उद्योगपती अवधूत तिंबलो यांनी दिला. हा सत्कार दत्ता नायक यांचा नसून प्रागतिक विचारसरणीचा असल्याचे ॲड. क्लिओफात आल्मेदा कुतिन्हो म्हणाले.
या प्रसंगी दत्ता नायक यांचा सत्कार खासदार व माजी केंद्रीय मंत्री डॉ. शशी थरुर यांच्या हस्ते करण्यात आला. मानपत्र व प्रसिद्ध चित्रकार सुबोध केरकर यांनी खास रेखाटलेले चित्र त्यांना प्रदान करण्यात आले. डॉ. फ्रान्सिस कुलासो यांनी स्वागत केले. डॉ. बबिता आंगले प्रभुदेसाई यांनी मानपत्राचे वाचन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.