गोव्यासाठी इफ्फीचे महत्व काय?

गोव्याच्या सिनेमाक्षेत्राला अभिमान ठरणाऱ्या अशा गोष्टींची नोंद देखील न घेणाऱ्या या पदाधिकाऱ्यांना काय म्हणावे?
What is the significance of IFFI for Goa?
What is the significance of IFFI for Goa?Dainik Gomantak
Published on
Updated on

यंदाच्या इफ्फीत (IFFI 2021) ‘@ 75 क्रिएटिव्ह माईंड’ या उपक्रमाखाली भारत सरकारच्या ‘प्रसारण आणि युवा व्यवहार मंत्रालया’कडून सिनेमाच्या क्षेत्रात भविष्यात आशादायक ठरू शकणाऱ्या 75 युवा सिनेकर्मींची निवड करण्यात आली आणि गोमंतकीयांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे त्या 75 युवकांमधले दोन युवक गोव्याचे होते. पण दुर्दैवाने गोव्याच्या (Goa) सिनेमाक्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याची भाषा करणाऱ्या ‘गोवा मनोरंजन संस्थे’ला त्याबद्दल अजूनदेखील काहीच ठाऊक नाही. गोव्याच्या सिनेमाक्षेत्राला अभिमान ठरणाऱ्या अशा गोष्टींची नोंद देखील न घेणाऱ्या या पदाधिकाऱ्यांना (संस्थेच्या व्यवस्थापिका, मुख्य कार्याधिकारी, उपाध्यक्ष आदी) काय म्हणावे? फक्त इफ्फीच्या समारंभात मिरवणे इतकेच त्यांचे काम आहे का? गोव्याच्या सिनेमाक्षेत्राचा झेंडा कोणीतरी उंच फडकावतो आहे, याच्याशी काहीही देणेघेणे नसलेली ही संस्था फक्त इफ्फीच्या दिवसात थाटमाट आणि रोषणाई करून मिरवण्याइतकीच चवचाल झाली आहे काय?

खरं म्हणजे सिनेमा क्षेत्रात काहीतरी करून दाखवायची धमक असलेले युवक गोव्यात किती तरी आहेत. उत्तम संस्कृतीचा, कलांचा वारसाही त्यांनी जपलेला आहे. त्यांच्यामधल्या कितीतरी जणांचे चित्रपट जगातल्या उत्तमोत्तम सिनेमा महोत्सवातून सादर झालेले आहेत. अशा सिनेकर्मींची नावे, ‘सिनेमाच्या प्रांतात गोव्याचे प्रतिनिधित्व आम्ही करतो’ असे म्हणणाऱ्याना ठाऊक तरी आहेत काय? यंदाच्या इफ्फीत ‘गोवा विभाग’ इतक्या उशिरा, तोदेखील अनेकांनी आवाज उठवल्यानंतर का जाहीर झाला या प्रश्नाचे उत्तर देताना मनोरंजन संस्थेच्या व्यवस्थापिकेने या प्रकरणाचा दोष सरळ मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसवर ढकलला. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांच्या कचेरीतून फाईल पास होऊन यायला उशीर लागला. सरळ सरळ मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसकडे बोट दाखवणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना काय म्हणावे? काय घडले ते साऱ्यांनाच ठाऊक होते.

What is the significance of IFFI for Goa?
आरआरआर चा ट्रेलर रिलीज, चाहत्यांची संपली प्रतिक्षा

जेव्हा ‘ईएसजी’च्या नेमक्या उद्दिष्टांबद्दल या व्यवस्थापिकेला विचारले तेव्हा त्यांनी आपला कम्प्युटर पाहून उत्तर दिले- ‘सिनेमा संबंधित साधनसुविधा तयार करणे हे ‘ईएसजी’च्या कार्यक्षेत्रात येते. त्याशिवाय इफ्फी तसेच युरोपियन फिल्म फेस्टिवल किंवा तत्सम कार्यक्रम आम्ही आयोजित करतो.’ यापुढे तिला इतर कामाची यादी सांगता येईना. जेव्हा तिला विचारले की गोव्यात सिनेमाविषयक शिक्षणाची तजवीज करणे हे देखील ईएसजीच्या कार्यक्षेत्रात येते का? तेव्हा तिने साइटवर ‘ईएसजी’ची उद्दिष्टे वाचण्यास त्यांनी सुरुवात केली आणि दुर्दैवाने त्यांना तशी एक देखील तरतूद उद्दिष्टात सापडली नाही. पण ‘इव्हेंट. मनोरंजन आणि चित्रपट उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास आणि नूतनीकरण करणे आणि रोजगारांच्या संधीमध्ये वाढ होईल असे वातावरण निर्माण करणे’ ह्या शब्दात मांडलेल्या एका उद्दिष्टात अप्रत्यक्षपणे हेच तर सांगितले आहे तिच्या लक्षात तरी आली असेल काय? हेच तर गोव्याच्या सिनेमाकर्मींचे दुर्दैव आहे.

संस्थेच्या उद्दिष्टांचा अर्थ हवा तसा लावायचा आणि इफ्फी आणि दोन-चार फुटकळ महोत्सव घडवून वर्षभर त्यांच्या ऑडिटमध्ये गुंतून राहायचे हा एक कलमी वार्षिक कार्यक्रम आहे असे डोक्यात गच्च ठरवल्यानंतर, स्थानिक सिनेकर्मींसाठी शैक्षणिक तसेच इतर उपक्रमांची योजना करायची गरज डोक्यात शिरेल तरी कुठून? गोव्याच्या सिनेकर्मींसाठी वर्षभर उपक्रम आखायचे सोडाच पण गोव्याच्या सिनेमा विकासासाठी कुठली पावले आपण उचलत आहोत या प्रश्नाला तिचा ‘निरागस’ प्रतिप्रश्न होता, - ‘गोयांखातिर किदे?’ त्यांच्या उत्तरातून असेच जाणवत होते की जणू फक्त आंतरराष्ट्रीय सिनेमाचा आणि त्यांच्या निर्मात्यांनाच व्यासपीठ देणे हेच ‘ईएसजी’चे उद्दिष्ट आहे आणि गोवा हा तिच्यासाठी दुय्यम भाग आहे.

‘ईएसजी’च्या व्यवस्थापिकेची मते ही प्रातिनिधिक आहेत का? संस्थेच्या कारभारात अशा बाबतीत फार लक्ष कधीच न घालणाऱ्या उपाध्यक्षांकडूनही यापेक्षा फार मोठ्या उत्तराची अपेक्षा बाळगता येणार नाही. मात्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तारीक थॉमस यांनी मात्र प्रांजळपणे कबूल केले की ‘ईएसजी’ची ही देखील एक महत्त्वाची जबाबदारी आहे की स्थानिक पातळीवर सिनेमाक्षेत्राचा नीट विकास त्यांच्यामार्फत व्हायला हवा आणि सिनेमाच्या शैक्षणिक अंगांकडे लक्ष पुरवणे आणि त्याची तजवीज करणे हे देखील ‘ईएसजी’चे कामच आहे. तेवढा थोडासा दिलासा त्यांच्या या वाक्यांमधून मिळाला.‘ईएसजी’चा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनात असलेला वाटा आणि ‘ईएसजी’ करत असलेले त्यासंबंधीचे नियोजन याबद्दल उद्याच्या अंकात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com