The Kerala Story Controversy: 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला स्थगिती देण्यास नकार देणाऱ्या केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणावर लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली, त्यानंतर सरन्यायाधीशांनी 15 मे रोजी सुनावणी घेण्यास सांगितले आहे.
5 मे रोजी केरळ हायकोर्टाने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायाविरुद्ध काहीही आक्षेपार्ह नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने आदेश देण्यापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला होता. हा निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, या चित्रपटात इस्लाम आणि मुस्लिमांच्या विरोधात काहीही नाही.
द केरळ स्टोरी'वरून वाद सुरूच
केरळ उच्च न्यायालयाने सांगितले की, या चित्रपटात मुस्लिम धर्मावर कोणताही आरोप करण्यात आलेला नाही, उलट ISIS ची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात त्या मुलींची कथा आहे ज्यांना नर्स व्हायचे होते, पण त्या ISIS च्या दहशतवादी बनल्या. या चित्रपटावरून देशभरात वाद सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर बंदी घातली आहे, तर यूपी सरकारने करमुक्त केले आहे.
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी, 'द केरळ स्टोरी ते आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटावर बंदी घालू पाहणाऱ्यांना ते चुकीचे वागत आहेत हे माहिती असले पाहिजे.
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने एकदा चित्रपट पास केला की, तर कोणालाच एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी होण्याचा अधिकार नाही' असे म्हटले आहे. शबाना आझमी यांचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या ट्विटवर अनेक युजर्संनी कमेंट देखील केल्या आहेत.
द काश्मिर फाइल'चा दिग्दर्शकाचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आता ममता बर्नजीच्या व्हिडिओवर जोरदार टिका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "दीदी माझ्याबद्दल बोलत आहेत. होय, खिलाफतने भडकावलेल्या डायरेक्ट अॅक्शन डे हत्याकांडातील वाचलेल्यांची मुलाखत घेण्यासाठी मी बंगालमध्ये आलो होतो. तुम्ही इतके घाबरलात का? काश्मीर फाइल्स, हत्याकांड आणि त्याबद्दल होते. दहशतवाद. काश्मिरी लोकांची बदनामी करायची होती असे तुम्हाला का वाटते? राजकीय पक्षाकडून निधी मिळतो असे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणता?"
विवेक अग्निहोत्री यांनी ममता बॅनर्जींना ट्विटरवर इशारा दिला की, "मी तुमच्यावर मानहानीचा खटला का दाखल करत नाही?"
दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील 'द केरळ स्टोरी' वरील बंदीवरुन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. ठाकूर म्हणाले की, 'काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे लोक सत्तेत असताना वेगळंच बोलायचे आणि आता ते खोटा अपप्रचार करत आहेत. तुष्टीकरणाचे राजरकारण भारतातील मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. राजकीय कारणामुळे विरोधी पक्षातील लोक निषेध करत आहेत.'
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, 'पश्चिम बंगालसारख्या राज्याने चित्रपटावर बंदी घालून मोठा अन्याय केला आहे. तिथे एका निष्पाप मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली, यावर ममता बॅनर्जी काहीच बोलत नाहीत, पण चित्रपटावर बंदी घालत आहेत. अशा दहशतवादी संघटनेच्या पाठीशी उभे राहून आणि त्यांच्या विचारसरणीचा प्रचार करुन तुम्हाला काय मिळत आहे?'
या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेनने केले आहे. या चित्रपटात चार सर्वसामान्य कॉलेजमधील मुलींना जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटनेत कशा प्रकारे सामिल करण्यात आले हे दाखवण्यात आले आहे.
जवळपास पाच महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. त्यानंतर 5 मे रोजी हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली देखील केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.