‘पेद्रो आणि कॅप्टन‘: अभिनयाच्या सूक्ष्मतेचे विराट दर्शन

‘मौनाच्या छळाचा’ आणि ‘छळाच्या मौनाचा’ अंगावर काटा आणणारा संघर्ष या नाटकात अत्यंत प्रभावीपणे दाखविला आहे.
Pedro and Captain drama

Pedro and Captain drama

Dainik Gomantak

सध्याच्या काळात आपल्या ‘विरोधकांचा’ विमोड करण्यासाठी ताब्यात घेतलेल्या ‘कैदी’ व्यक्तींचा चौकशीकर्त्यांनी केलेल्या शारिरीक-मानसिक छळाच्या वापरावर प्रश्नचिन्ह असताना, उरुग्वेयन लेखक मारियो बेनेडेटी यांच्या ‘पेड्रो अँड द कॅप्टन’ या नाटकाचा, नारायण आशा आनंद यांनी केलेला अनुवाद, अशा गैरवर्तनामागील मानसशास्त्राचा एक अस्पष्ट दृष्टीकोन समजण्यास मदत करतो. ‘मौनाच्या छळाचा’ आणि ‘छळाच्या मौनाचा’ अंगावर काटा आणणारा संघर्ष या नाटकात अत्यंत प्रभावीपणे दाखविला आहे.

या नाटकात (Drama) उरुग्वेमधील ‘तुपामारोस’, (माजी विद्यापीठ पदवीधर जे शहरी गनिमी सैन्य बनले) आणि लष्कर यांच्यातील संघर्ष, अनुक्रमे कैदी पेद्रो आणि त्याचा चौकशी कर्ता कॅप्टन द्वारे प्रतिनिधित केला आहे. तसेच ग्रीक नाटकांप्रमाणे क्रूरता, मारहाण, विजेचे शॉक या अंगावर शहारे आणणाऱ्या छळाच्या कृती ऑफ स्टेजला घडल्याचे दर्शवून, प्रत्यक्ष रंगमंचावर छळाच्या शारीरिक अभिव्यक्तींवर आणि मनोवैज्ञानिक गतिशीलतेवर अत्यंत बांधिव दृश्यांमध्ये लक्ष केंद्रित केले आहे.

<div class="paragraphs"><p>Pedro and Captain drama</p></div>
83 चा ट्रेलर पाहून दीपिका पदुकोण झाली भावूक

गोणीने डोके झाकलेल्या आणि हात बेडीने मागे बांधलेल्या पेद्रोला एका खोलीत फेकले जाते, जेथे कॅप्टन त्याला शांत भाषेत समजावून सांगतो “ प्रथम शांतता योग्य आहे, परंतु इथे येणारा प्रत्येक जण लवकर किंवा नंतर बोलतो वगैरे, वगैरे.” पुढे दोन पात्रांमधील भूमिका हळूहळू उलटताना दिसते. नाटकाच्या सुरुवातीला टॉर्चर चेंबरच्या पारंपारिक शक्ती संबंधाचे चित्रण केले जात असताना, कॅप्टन कैद्याची चौकशी करत असताना, पेद्रोने प्रश्न विचारण्यास सुरुवात करेपर्यंत आणि कॅप्टन उत्तर देईपर्यंत हळूहळू दोन व्यक्तींमधील शक्तीचे संतुलन बदलत जाते. चौकशी आणि छळ करणारा लष्करी अधिकारी ‘कॅप्टन’ आणि डाव्या विचारसरणीचा कार्यकर्ता कैदी, पेद्रो यांच्यातील संघर्षात पेद्रो आपले सहकारी आणि योजना यांची माहिती देण्यास नकार देऊन आपली प्रतिष्ठा राखतो आणि स्वत:ला आधीच मृत समजून वेदनेंच्या दुःखापासून वाचवतो.

पेद्रो नाटकात कैद्याच्या भूमिकेतून चौकशीकर्त्याच्या भूमिकेत शिरून एक उपरोधिक वळण घेतो, नाटकाच्या दरम्यान काढलेला एकमेव "कबुलीजबाब" कॅप्टनचा आहे. आपल्या भेदक प्रश्नांद्वारे, पेद्रो अत्याचाराच्या प्रथेत कॅप्टन तितकाच क्रूरपणे तडजोड करत असल्याचे कबूल करण्यास भाग पाडतो. निष्क्रीय आणि असहाय्य कैद्याऐवजी, पेद्रो एक मजबूत आणि हुशार व्यक्तिरेखा बनून कॅप्टनला त्याच्या स्वतःच्याच खेळात पराभूत करतो. कॅप्टन शेवटी पेद्रोला कबूल करतो की त्याला आधीच माहित आहे की जर त्याने काय केले आणि काय करत आहे याचा तपशील कधी समोर आला तर त्याची पत्नी इनेस आणि मुले त्याचा तिरस्कार करू शकतात. पण एवढे घृणास्पद काम करुनसुद्धा हाती काहीही मिळाले नाही तर याचे समर्थन करण्याचा कोणताही मार्ग त्याच्याजवळ नाही. जर एकाही माणसाची माहिती न देता तू मरण पावलास तर आपण संपूर्ण अपयशी आणि अपमानीत होईन. पण तू काही बोललास तर मला काहीतरी औचित्य मिळेल व याचा अर्थ असा होईल की माझी क्रूरता निरुपयोगी ठरली नाही, त्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. पराभूत ठरलेल्या कॅप्टनच्या कळकळीच्या विनंतीला ठोकरून मरणासन्न पेद्रो विजयी मुद्रेने खऱ्या मरणाचा प्रवास करतो.

नाटकाचे दिग्दर्शन अंकुश पेडणेकर यांनी बरीच मेहनत घेऊन केल्याचे दिसून आले. संहितेची विचारवस्तू, दृश्य मांडणी, सादरीकरणाचे स्वरूप, पात्रांचे स्वभाव, भावनिक प्रतिसाद यावर विचार केल्याचे जाणवले. दृश्य मांडणीतील नटांच्या जागा, हालचाली आणि हावभाव यामुळे नटांच्या सर्जनशीलतेला वाव मिळाल्याचे दिसले. रंगमंचाच्या डावीकडील भाग वापरून, प्रेक्षकांना उर्वरित रंगमंचावर बसवून त्यांना ‘इंटिमेट थिएटर’चा अनुभव देण्याची कल्पना छान होती. पण परीक्षक आणि समीक्षक बाहेर प्रेक्षागृहात असल्यामुळे त्यांच्या पाहण्याच्या कोनाचा विचार न झाल्यामुळे, बऱ्याच वेळा पात्रांचा चेहरा ब्लॉक झाला, तसेच रंगमंचावर बसवलेल्या प्रेक्षकांच्या मोबाईलमुळे अनपेक्षित परिणाम झाला.

नाटकात पेद्रोची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या उगम जांबावलीकर या नटाने आपल्या सूक्ष्म अभिनयाचे विराट दर्शन घडविले. त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीतून पेद्रोच्या स्वभावाच्या वृत्ती, त्याच्या भावना आणि नाटकाअंतर्गत हेतू , अचूक हेरून, चित्ताच्या एकाग्रतेने यथायोग्य अवलोकन करून, आपली भूमिका समर्थपणे सादर केली. पाय, हात, मान, चेहरा व पोट यांच्यावरील स्नायूंच्या अचूक नियंत्रणाने, अपेक्षित आवाज, शारीरिक संवेदनांच्या कमी-अधिक तीव्रतेच्या हालचाली, भूमिकेचा अभ्यास आणि संवादांच्या अर्थनिश्चिती द्वारे, अभिनयाचा उत्कृष्ट नमुना त्यांनी सादर केला.

पात्राचा हेतू, बोलण्याची पद्धती, संवादांच्या तळाशी असलेल्या शब्दांचा अर्थ आणि नाटकात न बोलता स्तब्ध राहून खूप काही व्यक्त करणारे ‘पॉझेस’, यांचा सखोल अभ्यास करून केलेल्या कॅप्टनच्या भूमिकेत नारायण आशा आनंद यांनी योग्य अभिनयाचे दर्शन घडविले. संयत आणि संवेदनशील पहिले दृश्य विशेष उल्लेखनीय. धीरगंभीर नाट्यानुभव घेताना प्राक्रुतिक स्वरुपात अश्लील असलेल्या शब्दांनी आपल्या स्वाभाविक अश्लीलतेच्या गुणधर्मांच्या पुढे जाऊन कॅप्टनच्या क्रूरतेची आणि विकृत मानसकितेची साथ धरल्याचे विषण्ण चित्र अभिनयातून दिसले.

संजय गावकर यांची नेपथ्यरचना सुटसुटीत होती. आवश्यक रंगमंचीय सामग्रीचा यथायोग्य उपयोग झाला. शिवदास उस्तेकर यांनी केलेली प्रकाशयोजना नाटकाच्या सादरीकरणात परिणामकारक वाटली. महादेव सावंत यांची कैद्याच्या चेहऱ्यावरील रंगभूषा विशेष उल्लेखनीय. गजानन झरमेकर यांचे पार्श्वसंगीत समर्पक होते. तसेच विजय तिनईकर यांनी नाटकाची वेशभूषा व्यवस्थितपणे सांभाळली.महात्मा गांधींचा संदर्भ खूप काही सांगून गेला. हुकुमशाही राज्य करणाऱ्या देशांत ‘घातक’ माहिती आणि ‘महत्वाची मते’ असणाऱ्यांना छळ, आत्महत्या, अपघात, आणि हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू येणे किती सामान्य आहे, या प्रचितीचा नाट्यानुभव ‘मंगलमू‍र्ती कलाबहार’, भिरोंडा-सत्तरीच्या सादरीकरणातून झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com