नंदन लवंदेने सिनेमॅटोग्राफर (Cinematographer) म्हणून काम केलेला ‘रिट्रायव्हल’ या चित्रपटाला ‘बाफ्ता ’ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. पुरस्कारांची अंतीम यादी जाहीर होईपर्यंत आता नंदनचे हृदय उत्सुकतेने धडधडत असेल. असं हृदय धडधडण्याचा काळही आनंदाचा असतो. आपल्या महत्त्वाकांक्षांचे पंख या काळात रुंद विस्तारलेले असतात. आपण आतापर्यंत घेतलेल्या श्रमांचा लेखाजोखा समोर येण्याचा हा काळ असतो.
नंदन लवंदे पणजीचा. लहान असताना तो आपल्या वडिलांबरोबर शहरात चाललेले एक शूटिंग पाहायला गेला होता. त्याचे वय असेल सुमारे दहा-अकरा वर्षांचे. त्या शूटिंगदरम्यान त्याने पाहिले की त्या सिनेमाचा (Movie) जो कॅमेरामन होता त्याच्या अवतीभोवतीच सारेजण कोंडाळे करून फिरताहेत. तो एक महत्वाचा माणूस असल्यासारखी त्याला वागणूक मिळते आहे. नंदनच्या मनात, आपणही त्या माणसासारखंच, म्हणजे सिनेमॅटोग्राफर बनावे ही ठिणगी त्याचवेळी कदाचित पडली असावी. त्यानंतर त्याने 35 मिमी कॅमेऱ्यावर (Camera) स्टील फोटोग्राफी (Photography) करायला सुरुवात केली. आपण सिनेमॅटोग्राफर बनायचे हे आपले ध्येय त्याने कधीच नजरेआड केले नाही.
दहावी पूर्ण केल्यानंतर आपली फोटोग्राफीची आवड त्याने अधिकच विकसित केली. कॅमेराबद्दल त्याने अधिक जाणून घेतले. आपला कॅमेरा अपग्रेड केला. बारावीची परीक्षा दिल्यानंतर तो ‘मास कम्युनिकेशनचा कोर्स (फिल्म मेकींग) करण्यासाठी पुण्याला गेला. त्याने ‘तिलक महाराष्ट्र विद्यापीठा’मधून हा चार वर्षांचा कोर्स पूर्ण केला आणि त्यानंतर त्याने लॉस एंजलिसमधल्या ‘न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी’मध्ये सिनेमॅटोग्राफर बनण्याच्या इच्छेला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रवेश घेतला. या अॅकडमीत दीड वर्षांचा सिनेमॅटोग्राफीचा कोर्स पूर्ण करण्याच्या दरम्यान त्याने म्युझिक (Music) व्हिडिओसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले. खरे म्हणजे तिथल्या अभ्यासक्रमाचा तो एक भागच असतो. तिथे शिक्षण घेत असताना बाहेर स्वतंत्रपणे सिनेमा निर्मिती करत असलेल्या संस्थांच्या सहयोगाने काम करणे अनिवार्य असते.
अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सेमिस्टरला असताना ‘रिट्रायव्हल’ या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी स्वतंत्रपणे करण्याची संधी नंदनला मिळाली. या सिनेमाला ‘बाफ्ता’ या प्रतिष्ठेच्या चित्रपट स्पर्धेत नामांकन मिळाले आहे. यातल्या विजेत्यांची अंतिम यादी जून-जुलै महिन्यात जाहीर होईल. नंदन आपल्या छातीवर हात धरून या यादीच्या प्रतीक्षेत नक्कीच असेल. मुळात नंदनला, आपल्याला काय करायचे आहे हे ठामपणे ठाऊक होते. अगदी सुरुवातीपासून. त्यामुळेच नंदन आज अमेरिकेतल्या एका संस्थेत आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात शिक्षण घेऊ शकला. नंदन म्हणतो, ‘जर तुम्ही तुमचे काम उत्कटतेने केले व तिथल्या लोकांना वाटले की ते दर्जेदार व प्रामाणिक आहे तर तिथे शिक्षण घेण्यासाठी आपल्याला ग्रांट नक्कीच मिळू शकते’. ‘न्यूयॉर्क फिल्म अॅकडमी’ने त्याला दिलेल्या ग्रँटमुळे नंदनला अमेरिकेत सिनेमॅटोग्राफीचे शिक्षण घेणे शक्य झाले.
लॉस एंजलिसमधले सुरूवातीचे दिवस हे नंदनसाठी एक ‘कल्चरल शॉक’ होता पण नंदन म्हणतो, तिथे असलेले सारेजण एकाच ध्येयाने तिथे पोचले होते. सिनेमा हीच सर्वांची एकमेव आवड होती. याच समाईक आवडीमुळे पुढे सारेजण एकमेकांशी जुळले गेले. सुरुवातीला जाणवलेला ‘कल्चरल शॉक’ नंतर कुठल्याकुठे गायब झाला. या अभ्यासक्रमात, सिनेमॅटोग्राफर बनण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रत्येकाला या क्षेत्राशी निगडित असलेल्या लहान-सहान विभागातून प्रथम काम करावे लागते. ‘लाइटिंग’, ‘फोकस पुलिंग’, ‘ग्राफर’, ‘ग्रीप’ इत्यादी तत्सम कामे केल्यानंतर एक प्रकारच्या स्थैर्याची भावना मनात येते आणि सिनेमॅटोग्राफर बनण्यासाठी एक क्षमता मानसिकरित्या तयार होते.
नंदनने गोवा (Goa) ते लॉस एंजलिस हा प्रवास आपल्या इच्छाबळावरच पूर्ण केला आहे. अर्थात त्याचे वडील, नारायण प्रभु-लवंदे आणि आई लक्ष्मी प्रभू-लवंदे यांचादेखील त्याला त्यासाठी भरभक्कम पाठिंबा होताच. नंदन सध्या सुट्टीवर गोव्यात आला आहे. पुढच्या काही दिवसांनी तो पुन्हा अमेरिकेत (America) असेल. नंदनच्या रूपाने हॉलिवूडला (Hollywood) आणि सिनेमाउद्योगाला एक चांगला गोमंतकीय चेहरा सिनेमॅटोग्राफर म्हणून लाभावा हीच त्याला दैनिक गोमंतकची शुभेच्छा!
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.