सरकार बदलले की त्याचे परिणाम प्रामुख्याने सांस्कृतिक आणि कलात्मक क्षेत्रांमध्ये लवकर दिसू लागतात. दरवर्षी होणाऱ्या इफ्फीमध्ये (IFFI) हे बदल ठळकपणे गेल्या काही वर्षांपासून दिसू लागले आहेत. इफ्फीमध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या आणि त्याचप्रमाणे कदाचित खास इफ्फीसाठी (IFFI) म्हणून तयार करण्यात येणाऱ्या लघुपट (Short Film) , माहितीपट आणि सिनेमामध्ये (Movie) या राजकीय स्थित्यंतराचे दृश्य परिणाम दिसून येत आहेत. सुरुवातीच्या काळात साधारणता सर्वसमावेशक आणि सर्व विचारधारांना सोबत घेऊन जाणारे सिनेमे, लघुपट (Short Film) , माहितीपट यांचा समावेश होत असे. मात्र गेल्या सहा-सात वर्षांमध्ये या सर्वसमावेशक सिनेमांची (Movie) उणावत जाऊन आता उजव्या विचारधारेचे उदात्तीकरण करणाऱ्या सिनेमांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढताना दिसत आहे.
यावर्षीच्या इफ्फीतही (IFFI 2021) सरकार बदलाचे सिनेमात्मक परिणाम दिसून येत आहेत. अर्थात हे परिणाम गेल्या पाच-सहा वर्षांपासून दिसत असले तरी गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये देशात झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार आणि इफ्फीमध्ये (IFFI) विशेषत्वाने अधिक अधोरेखित होत आहेत. केंद्रातील सरकार हे उजव्या विचारसरणीचे असल्याचे परिणाम आता सिनेनिर्मितीवरही थेट दिसू लागल्याचे इफ्फीत (IFFI) अलिकडे चर्चिले जात असते. यावर्षीच्या इफ्फीतील (IFFI) इंडियन पॅनोरमा विभागात (Indian Panorama), उजव्या विचारसरणीकडे झुकणारे, त्याचप्रमाणे वेद, संस्कृत भाषा, मनुस्मृती, हिंदुत्व, सनातन हिंदू धर्म यांचे उदात्तीकरण करणारे लघुपट (Short Film) आणि सिनेमे (Movie) ठळकपणे प्रदर्शित झाले आहेत.
इंडियन पॅनोरमा भारतीय चित्रपटांचे प्रतिनिधित्व करतो. सुमारे दोनशेहून अधिक सिनेमांमधून निवडक 20/21 सिनेमांची आणि 20 लघुपटांची (Short Film) निवड या विभागात करण्यात येते. यावर्षीच्या इफ्फीतील 'इंडियन पॅनोरमा (Indian Panorama) विभागातील सिनेमाची घोषणा जेव्हा करण्यात आली तेव्हा ती यादी पाहतानाच शंकेची पाल चुकचुकली होती. कारण एकीकडे दिमासा, संथाली, मैथिली या भाषांमधील सिनेमांची निवड केल्यामुळे इंडियन पॅनोरमा (Indian Panorama) आकर्षण वाढलेले असतानाच, दुसरीकडे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उजव्या विचारसरणीला जवळ जाणाऱ्या सिनेमांची (Movie) किंवा लघुपटांची (Short Film) निवड करण्यात आलेले दिसली. सुरुवातीला वाटले होते कदाचित सिनेमाची नावे 'मिसलीड' करणारी असू शकतात आणि कदाचित सिनेमाचा (Movie) मोकळ्या विचारांचा किंवा काही नवा अभ्यासपूर्ण विचार मांडणारा असू शकतो. पण आज पाचव्या दिवसाअखेरपर्यंत तरी असा काही सुखद धक्कावगैरे मिळाला नसल्याने अनेक सिनेरसिकांनी आपला होरा खरा ठरल्याचे सांगितले.
उदाहरणादाखल आज सकाळच्या सत्रातील पहिलाच माहितीपट –‘भारत: प्रकृती का बालक’, देशाबद्दल काहीएक नवी माहिती मांडू शकणारा असे वाटले होते. पण वास्तवात मात्र या तासभर लांबीच्या माहितीपटातून कट्टर हिंदुत्ववाद, मनुवाद, संस्कृत हीच कशी जगातील सगळ्यात पुरातन भाषा आहे. हेच मांडण्यात येत होते. माहितीपटाच्या नावावरून सुरुवातीला असे वाटत होते की निसर्ग आणि भारत (India) किंवा भारतातील नैसर्गिक विविधता या संदर्भात काही माहिती देण्यात येईल. प्रत्यक्षात मात्र मुस्लीम आणि इंग्रज यांच्यावर कित्येकदा थेट किंवा अप्रत्यक्ष टीका यात करण्यात आली होती. त्याचवेळी साम्यवादी विचारांचा सोयीनुसार वापर करतानाच एके ठिकाणी त्यावर टीका करणे सुरु होते आणि त्याचवेळी दुसऱ्या ठिकाणी साम्यवादी विचारवंताचे सोयीनुसार दाखले देणे सुरू होते. बरे हे सगळे सुरु असताना या माहितीपटात जी माहिती ते मांडत आहेत, त्याबद्दल काही ठोस विधाने, संदर्भ द्यावे तर तसेही नव्हते.
कारण बहुतांश ठिकाणी 'असे असू शकेल' 'असे वाटते', अशी शक्यता आहे.' असे म्हटले जाते.' अशी सबगोलंकारी विधाने केली गेली होती. दुसरीकडे आपल्या विचारांच्या पुष्ट्यर्थ माहितीपट करताना त्यांनी कोणतेही ठोस संदर्भ ग्रंथ, अभ्यास ग्रंथ यांचे संदर्भ दिले नव्हते. मनुस्मृती, ऋग्वेद, अभिजात शाकुंतल आदींमधील श्लोक यांची निवड करत संपूर्ण मांडणी करण्यात आली होती. हीच गोष्ट थोड्याबहुत फरकाने इतर काही माहितीपटातून दिसत होती. एकूण या महोत्सवातील माहितीपटांचा आणि लघुपटांचा (Short Film) दर्जा हा निर्मिती आणि मूल्यात्मकदृष्ट्या अत्यंत दुय्यम ठेवून त्यांच्या माध्यमातून उजवी विचारसरणी रुजवण्याचे कामच मोठ्या प्रमाणात होत आहे, असे निरीक्षण अनेक सिनेरसिकांनी नोंदवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.