Fighter Advance Booking: दीपिका पादूकोण आणि हृतिक रोशन यांची मुख्य भूमिका असलेला फायटर हा सिनेमा लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. महत्वाचे म्हणजे, हा ट्रेलर चाहत्यांना भलताच आवडला होता. आता चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे आणि बॉलिवूडला वर्षातील पहिली मोठी ओपनिंग मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच निमित्ताने 'पठाण' प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे शाहरुख खानचा चित्रपटही सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली बनला होता. मात्र अॅडव्हान्स बुकिंगच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, 'फायटर' हा देशभक्तीने ओतप्रोत झालेला अॅक्शन चित्रपट असूनही तो पहिल्या दिवशी 'पठाण' प्रमाणे कामगिरी करू शकणार नाही.
20 जानेवारीपासून 'फायटर'चे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसा, 21 जानेवारीच्या रात्रीपर्यंत दोन दिवसांत या चित्रपटाची 2.86 कोटी रुपयांची तिकिटे विकली गेली आहेत. आतापर्यंत देशभरात चित्रपटाच्या 7595 शोसाठी आगाऊ बुकिंग सुरू झाले असून रविवारी रात्रीपर्यंत 87 हजार 163 तिकिटांची विक्री झाली आहे. यामध्ये हिंदी 2D, 3D, IMAX 3D आणि 4DX 3D मधील शो समाविष्ट आहेत.
'फायटर'चे बजेट 250 कोटी रुपये आहे. पहिल्या दिवसाच्या आगाऊ बुकिंगसाठी अजून तीन दिवस बाकी आहेत. साहजिकच येत्या काही दिवसांत याला आणखी वेग येईल. त्यामुळे 'फायटर' रिलीजपूर्वी 10-12 कोटी रुपयांपर्यंतचे अॅडव्हान्स बुकिंग घेऊ शकते, असा अंदाज आहे. असे झाले तर पहिल्याच दिवशी हा चित्रपट देशात 25-30 कोटी रुपयांची कमाई करेल. मात्र, प्रजासत्ताक दिनी 57 कोटींची कमाई करणारा 'पठाण'चा विक्रम तो मोडू शकणार नाही. पण 6 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'पद्मावत'च्या 24 कोटींच्या कमाईला तो नक्कीच मागे टाकेल अशा प्रकारच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.
हृतिक रोशन हा असा बॉलिवूड सुपरस्टार आहे ज्याच्या चित्रपटांनी नेहमीच बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. 'कहो ना प्यार हो' किंवा 'कोई मिल गया फ्रेंचाइज' हा त्याचा डेब्यू चित्रपट असो, हे सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. 'फायटर'च्या ट्रेलर आणि टीझरला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय त्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत. तसेच, 2024 मध्ये प्रदर्शित झालेले 'मेरी ख्रिसमस' आणि 'मैं अटल हूं' चित्रपटगृहांमध्ये काही विशेष कमाई करु शकले नाहीत. हृतिक रोशन, दीपिका पादुकोन, अनिल कपूर या बड्या कलाकारांचा फायटर चित्रपट चाहत्यांचे मन जिंकणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.