पणजी: ‘वीरांगना’ याचा अर्थ आहे अतिशय शूर, पराक्रमी महिला. अशी महिला आपल्या हक्कांसाठी समोरच्या व्यक्तीबरोबर मोठ्या धैर्याने लढा देते. एक कणखर, सशक्त महिला केवळ स्वतःचे रक्षण करते असे नाही तर इतरांचेही रक्षण करते, असे मत ‘वीरांगना’ या आसामी माहितीपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते किशोर कलिता यांनी आज व्यक्त केले. इफ्फीत (IFFI) आज माहितीपटाच्या प्रदर्शनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
इंडियन पॅनोरमाच्या नॉन-फीचर फिल्म विभागात ‘वीरांगना’ची निवड झालीय. 2012 मध्ये आसाम पोलिस खात्यात महिला कमांडो दल-वीरांगनाची स्थापना करण्यात आली. देशात महिलांचे कमांडो दल पहिल्यांदाच तयार करण्यात आले होते. ‘वीरांगना’ या 21 मिनिटांच्या माहितीपटात आपल्याला महिला कमांडो समाजातली वाढती गुन्हेगारी, विघातक कृत्ये रोखण्यासाठी कशा प्रकारे आणि किती आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जातात, हे दिग्दर्शकाने दाखवले आहे. कमांडो दलाच्या सर्व कामांमध्ये, उपक्रमांमध्ये वीरांगना कशा सहभागी होतात, याचे दर्शन या माहितीपटात घडवले आहे. दरम्यान, ‘वीरांगना’ हा माहितीपट विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला आहे. कोचिन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून त्यास पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
‘वीरांगना’ गणवेशातल्या कमांडो ज्यावेळी रात्री-बेरात्री, मध्यरात्री रस्त्यावर गस्त घालत असायच्या, त्यावेळी सर्वसामान्य महिलांनाही सुरक्षित वाटायचे. हाच धागा पकडून त्या संकल्पनेवर ‘वीरांगना’ची कथा पडद्यावर मांडली.
- किशोर कलिता, सिनेदिग्दर्शक आणि निर्माते
चित्रीकरण, त्यानंतर फेरचित्रीकरण, पटकथा लिहिणे आणि केलेले बदल पुन्हा एकदा लिहिणे यासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागला. मात्र आम्हाला अपेक्षेपेक्षाही चांगले परिणाम मिळाले. .
- उत्पल दत्त, लेखक आणि चित्रपट समीक्षक
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.