

प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजीत सिंग याने गायकीतून निवृत्ती जाहीर केली आहे. या धक्कादायक निर्णयामुळे केवळ बॉलिवूडच नव्हे, तर जगभरातील त्याचे चाहते चक्रावून गेले आहेत. अरिजीतने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (ट्विटर) वर एक भावूक पोस्ट शेअर करत आपण आता पार्श्वगायन थांबवत असल्याचे स्पष्ट केले आहे.
नवे वर्ष सुरू झाले असतानाच अरिजीतने आपल्या चाहत्यांना हा मोठा धक्का दिला आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "नव्या वर्षात मी कोणत्याही चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड करणार नाही. आतापर्यंतचा हा प्रवास अत्यंत सुंदर आणि संस्मरणीय होता. श्रोते म्हणून तुम्ही मला जे प्रेम दिले, त्यासाठी मी तुमचा सदैव ऋणी राहीन. पण आता मला असे वाटते की, मी इथेच थांबायला हवे." अरिजीतच्या या एका निर्णयामुळे संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
अरिजीतने जरी पार्श्वगायन (Playback Singing) सोडण्याचा निर्णय घेतला असला, तरी तो संगीत क्षेत्रापासून पूर्णपणे तुटणार नसल्याचेही संकेत दिले आहेत. चित्रपट संगीतातून निवृत्ती घेत असली तरी, कदाचित तो संगीत निर्मिती किंवा इतर स्वतंत्र प्रकल्पांमध्ये कार्यरत राहू शकतो. "मी आता नवीन गाणी गाणार नाही, हे सांगताना मला समाधान वाटत आहे," असेही त्याने नमूद केले. त्याच्या या विधानाचा अर्थ असा लावला जात आहे की, त्याने विचारपूर्वक हा 'ब्रेक' घेण्याचे ठरवले आहे.
'आशिकी २' मधील 'तुम ही हो' पासून सुरू झालेला अरिजीतचा प्रवास 'केसरिया' पर्यंत अवघ्या जगाने अनुभवला आहे. विरह असो वा प्रेम, प्रत्येक भावनेला आपल्या आवाजाने जिवंत करणाऱ्या अरिजीतने अचानक संन्यास घेतल्यामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांना पूर आला आहे. अनेक चाहत्यांनी "अरिजीतशिवाय संगीत अपूर्ण आहे," अशा भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या या निर्णयामुळे अनेक मोठ्या चित्रपटांच्या संगीत नियोजनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.