शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) अनेक चित्रपटांमध्ये सह कलाकार म्हणून भूमिका साकारलेली अभिनेत्री जुही चावलाने (Juhi Chawla) आर्यन खानची (Aryan Khan) आज तुरुंगातून सुटका करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिने आर्यनचा जामीन भरला. यावेळी कोर्टाने एक लाख रुपयांचा जामीन अर्ज मंजूर केला. मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात जिथे आर्यनने 22 दिवस घालवले होते, तिथे सुटकेची कागदपत्रे पाठवण्यासाठी कोर्टासाठी ही प्रक्रिया आवश्यक होती. विशेष म्हणजे, जुही अनेक चित्रपटांमध्ये आर्यनच्या वडिलांची म्हणजेच शाहरुख खानची सहकलाकार राहिली आहे. या दोघांच्या जोडीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. नंतर ते दोघेही आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचे सह-मालक बनले. आर्यन खान आणि जुही चावलाची मुलगी जान्हवी नुकतेच आयपीएलच्या खेळाडूंच्या लिलावात एकत्र दिसले.
विशेष म्हणजे क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी आर्यन खानला जामीन मंजूर केला. आर्यनसोबत या प्रकरणातील अन्य दोन आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एनडब्ल्यू सांबरे यांच्या एकल खंडपीठाने सांगितले होते की, "तीन्ही अपिलांना परवानगी आहे. आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत सविस्तर आदेश देऊ." त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी रोख जामीन मंजूर करण्याची परवानगी मागितली होती.
कोर्टाच्या आदेशात आर्यनच्या जामिनासाठी 14 अटी घालण्यात आल्या आहेत. पोलिसांना कळवल्याशिवाय आर्यन मुंबई सोडू शकणार नाही, त्याला दर शुक्रवारी एनसीबीसमोर हजर राहावे लागेल, असे न्यायालयाच्या अटींमध्ये नमूद करण्यात आले आहे. जामीन आदेशानुसार, त्यांना एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक जमा करावा लागेल आणि त्यांचा पासपोर्ट जमा करावा लागेल. अटींनुसार आर्यन परवानगीशिवाय देश सोडू शकणार नाही, अरबाज मर्चंट आणि या प्रकरणातील आरोपी मित्रांशी बोलू शकणार नाही. त्याचबरोबर मीडियाशीही बोलण्यास आर्यनवर रोख असणार आहे. आर्यनला शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. न्यायालयीन सुनावणीत आर्यनला उपस्थित राहून आवश्यकतेनुसार तपासात सहकार्य करावे लागेल. न्यायालयाच्या आदेशानुसार, यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन झाल्यास, एनसीबीला जामीन रद्द करण्याची विनंती करण्याचा अधिकार असेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.