Fire News: शहरातील उभाबाजार बाजारपेठेतील धान्यव्यापारी स्वप्नील वसंत पावसकर यांच्या किराणा दुकानास आज सकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी वेळीच शर्थीचे प्रयत्न करून विझविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना काल सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
पावसकर रविवार (ता.1) रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. सकाळी त्यांच्या दुकानाच्या माडीवर शॉर्टसर्किट होऊन आग लागली. काही क्षणातच आग वाढून सिलिंगला लागली. दुकान बंद असल्याने कोणाला समजले नाही. तेथील धीरज भिसे या मार्गाने जाताना त्यांना दुकानातून धूर दिसला. त्यांनी सर्वांना कऴवले.
पावसकरांना बोलावून दुकान उघडण्यात आले. त्यानंतर स्वप्नील पावसकर, भिसे, आशुतोष भांगले, अक्षय गावडे, राकेश केसरकर, साई पावसकर, सायली पावसकर, तसेच अनेक ग्रामस्थांनी तत्काळ पाणी मारून आग विझवली. तरीही किराणा सामान, पैसे, कागदपत्रे फर्निचर, पंखा आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. छपराचेही मोठे नुकसान झाले. खालील सामानही पाणी पडून भिजून गेले.
बाजारपेठेतील दुकाने खेटून आहेत. सुदैवानेच आग वेळीच आटोक्यात आल्याने अनर्थ टळला. बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी पंचनामा केला. बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतिब यांनी घटनास्थळी भेट दिली.
भाऊ वळंजू, सर्वेश गोवेकर, तेजस येडवे, सुनील बांदेकर, ज्ञानेश्वर येडवे आदींसह अनेक ग्रामस्थ मदतकार्यात सहभागी झाले. लवकरच मिनी अग्निशमन बंबासाठी प्रयत्न करू, असे सरपंच नाईक यांनी सांगितले.
दुकानाच्या माडीवरील फॅनला आग लागून शॉर्टसर्किट झाल्याचे निदर्शनास आले. दुकान लाकडी असल्याने लगेच पेट घेतला. दुकानातील कडधान्य मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दुकानातील साहित्याचे दोन लाख 35 हजार, लाकडी बेडचे 20 हजार, छपराचे 80 हजार, टेबलचे 15 हजार, फॅनचे दोन हजार असे तीन लाख 52 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.