

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नगरपालिका जिंकण्यासाठी मोठी मोहीम उभी केली असताना, शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपचीच कोंडी केल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप करत पुरावेही समोर आणले होते. हा वाद अद्याप शांत होण्याची चिन्हे नसतानाच आता आणखी एका प्रकरणाने राजकीय वातावरण तापले आहे.
आमदार निलेश राणे यांनी मालवणमधील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरावर अचानक धाड टाकून खळबळ उडवून दिली. या धाडीत त्यांना मोठ्या रक्कमेची रोख रकमेची बॅग आढळून आली, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पैशांचा वापर होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ही घटना समोर येताच परिसरात तसेच राजकीय वर्तुळात एकच गदारोळ माजला आहे.
धाड टाकण्यात आलेले पदाधिकारी म्हणजे विजय केनवडेकर, जे भाजपचे स्थानिक पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या घरी निलेश राणे अचानक पोहोचल्याने ते आणि त्यांच्यासोबत असलेले भाजप कार्यकर्ते बंड्या सावंत यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. राणे यांनी "मी कोणाच्या बेडरूममध्ये जाणार नाही, काय असेल ते बाहेर आणा" असे स्पष्ट शब्दांत सांगितल्याची माहिती मिळते.
यानंतर कार्यकर्त्यांनी राणेंना बेडरूममध्ये नेले आणि तिथेच मोठ्या प्रमाणावर रोख रकमेने भरलेली बॅग सापडली. या बॅगेत ५०० रुपयांची बंडले असल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येते. ही रक्कम नेमकी कोणासाठी ठेवली होती आणि तिचा उपयोग काय होता, याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क सुरू आहेत.
या संपूर्ण प्रकारामुळे मालवण नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले आहे. भाजपच्या अडचणी वाढताना दिसत असून निलेश राणे यांच्या कृतीमुळे या निवडणुकीत अनपेक्षित वळणे पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.