
एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शांत झाला असला तरी दुसरीकडे दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराबरोबर इतर संरक्षण यंत्रणा पुन्हा एकदा सक्रीय झाल्या आहेत. याचदरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा संस्था म्हणजे एनआयएला मोठे यश मिळाले आहे. शनिवारी (16 मे) एनआयएने मुंबई विमानतळावर दोन फरार आयसिस दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
अब्दुल्ला फयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानच्या (Pakistan) आयसिस संघटनेचे स्लीपर सेल म्हणून काम करायचे. आयईडी टेस्टिंग प्रकरणात आरोपी म्हणून एनआयए 2023 पासून या दहशतवाद्यांचा शोध घेत होती.
एनआयएने अटक केलेले दोन्ही दहशतवादी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही दहशतवादी गेल्या दोन वर्षांपासून जकार्तामध्ये लपून बसले होते. हे दोन्ही दहशतवादी जकार्ता येथून भारतात परतण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी, या दहशतवाद्यांना एनआयएने पकडले. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, अब्दुल्ला फयाज आणि तल्हा खान गेल्या दोन वर्षांपासून फरार होते. एनआयए बराच काळ त्याचा शोध घेत होती.
एनआयएच्या विशेष न्यायालयाने या दोन्ही दहशतवाद्यांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. एनआयए अनेक दिवसांपासून या दहशतवाद्यांचा शोध घेत होती. एवढेच नाहीतर एजन्सींनी या दोन्ही दहशतवाद्यांवर प्रत्येकी 3 लाखांचा इनामही जाहीर केला होता. या दहशतवाद्यांना देशाला इस्लामिक देश बनवायचे होते.
दरम्यान, या दोन्ही दहशतवाद्यांवर देशात दहशत पसरवण्याचा आणि दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप होता. याशिवाय, त्यांच्या सेलमधील 8 दहशतवाद्यांना एनआयएने आधीच अटक केली आहे. हे दहशतवादी बॉम्ब बनवण्यात माहिर होते. यासाठी त्यांनी 2022-23 मध्ये पुण्यात एक कार्यशाळाही आयोजित केली. या सेलचा मुख्य उद्देश देशातील शांतता भंग करणे आणि हल्ले करणे हा होता.
एनआयएने या सेलमध्ये अटक केलेल्या सर्व दहशतवाद्यांच्या (Terrorists) नावांची यादी जाहीर केली असून त्यात मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाव नसिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शमिल नाचन, आकीफ नाचन आणि शाहनवाज आलम यांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.