मुंबई-गोवा महामार्गावर कडेकोट बंदोबस्त! 400 गृहरक्षक जवानांसह SRPF तुकडी तैनात, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी विशेष नियोजन

Mumbai Goa Highway Ganeshotsav 2026: गणेशभक्तांना प्रवासात कोणतीही मोठी गैरसोय होऊ नये, यासाठी रायगड प्रशासनाने विशेष नियोजन सुरू केले आहे.
Mumbai Goa Highway Ganeshotsav 2026
Mumbai Goa Highway Ganeshotsav 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

गणेशोत्सवासाठी मुंबई आणि परिसरातून मोठ्या संख्येने भाविक कोकणाकडे रवाना होतात. या काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वाहतूककोंडी, अपघात तसेच प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या इतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यंदा गणेशभक्तांना प्रवासात कोणतीही मोठी गैरसोय होऊ नये, यासाठी रायगड प्रशासनाने विशेष नियोजन सुरू केले आहे. वीज, पाणी, वाहतूक नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन मदत याबाबत विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिले.

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होणाऱ्या ठिकाणांची आधीच पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पर्यायी मार्गांचा वापर करावा लागल्यास वाहनचालकांना योग्य माहिती मिळावी, यासाठी प्रमुख ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले जाणार असून, वाहन बिघाड किंवा अपघात झाल्यास वाहतूक अडवली जाऊ नये यासाठी टोइंग क्रेनचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

Mumbai Goa Highway Ganeshotsav 2026
Goa Women Reservation: गोवा विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण द्या! अधिवेशनात ठराव मंजूर करा, महिला आघाडीची मागणी

२० क्रेन आणि २० रुग्णवाहिका सज्ज

गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावरील आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्थेसाठी २५ मोटरसायकली, २० टोइंग क्रेन आणि २० रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहेत. एखादे वाहन रस्त्यात बंद पडल्यास किंवा अपघात घडल्यास शक्य तितक्या कमी वेळेत मदत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

रुग्णवाहिका उपलब्ध असल्यामुळे गंभीर परिस्थितीत जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत होणार आहे. महामार्गावर गस्त आणि वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथकांचाही वापर केला जाणार आहे.

रायगडमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस यंत्रणा तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये ७ पोलिस उपनिरीक्षक, १२८ पोलिस अधिकारी आणि १,९०० पोलिस अंमलदार यांचा समावेश आहे.

याशिवाय सुमारे ४०० गृहरक्षक दलाचे जवान तसेच एसआरपीएफची एक कंपनी बंदोबस्तासाठी तैनात केली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी तसेच महामार्गावरील महत्त्वाच्या भागांमध्ये पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.

गणेशभक्तांसाठी ठिकठिकाणी सुविधा केंद्रे

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मार्गात मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी सुविधा केंद्रे उभारली जाणार आहेत. खारपाडा, खारेपाटण, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड, महाड एमआयडीसी आणि पोलादपूर येथे ही केंद्रे कार्यरत असतील.

या केंद्रांवर पिण्याचे पाणी, प्राथमिक वैद्यकीय मदत, पोलिस मदत कक्ष तसेच महिला आणि बालकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रवासादरम्यान वाहनांशी संबंधित समस्या निर्माण झाल्यास आवश्यक सेवा मिळण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

Mumbai Goa Highway Ganeshotsav 2026
Goa Stray Dogs: 1.5 लाख भटके कुत्रे, 16 लाख लोकसंख्या; गोव्यात सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर

शांतता समितीच्या बैठकीत प्रशासनाला सूचना

जिल्हा नियोजन भवन येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गणेशोत्सवातील गर्दी, वाहतूक, सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

बैठकीला महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक आचल दलाल यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित करण्याचे आव्हान

गणेशोत्सवात कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्याने महामार्गावरील व्यवस्थेची मोठी परीक्षा होणार आहे. त्यामुळे वाहतूक नियोजनासोबतच पाणी, आरोग्य, सुरक्षा आणि आपत्कालीन मदत यांचा एकत्रित आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रशासन आणि विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून गर्दीच्या काळात प्रवाशांना कमीत कमी अडचणींचा सामना करावा लागेल, यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com