कोकणातल्या चाकरमान्यांना 'लालपरी'चा आधार; 'शिमगोत्सवासा'ठी मुंबई–कोकण मार्गावर जादा गाड्या धावणार, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक
मुंबई: 'शिमगोत्सव' (होळी) आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून लाखो चाकरमानी आपल्या गावी जात असतात. प्रवाशांची ही प्रचंड गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) २०२६ च्या शिमगोत्सवासाठी विशेष जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. मुंबई महानगर परिसरातील विविध आगारांतून कोकणातील कानाकोपऱ्यात जाणाऱ्या बसेस सोडण्यात येणार आहेत.
प्रमुख आगारांतून सुटणाऱ्या गाड्या
मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला-नेहरू नगर, ठाणे, बोरीवली, नालासोपारा आणि विठ्ठलवाडी या प्रमुख ठिकाणांहून खेड, दापोली, गुहागर, चिपळूण, महाड, लांजा, देवरुख अशा विविध गावांकडे या जादा बसेस धावणार आहेत. २७ आणि २८ फेब्रुवारी २०२६ पासून या बससेवेला सुरुवात होणार आहे.
वेळापत्रक
मुंबई सेंट्रल (२७ फेब्रु. पासून): कासे (रात्री ८:३०), खेड (९:३०), गुहागर (१०:००) आणि दापोली (१०:४५).
परळ (२८ फेब्रु. पासून): दापोली (सकाळी ६:००), देवरुख (संध्या. ७:३०) आणि खेड (रात्री १०:००).
कुर्ला व सायन (२७ फेब्रु. पासून): गुहागर (रात्री ९:३०), खेड (१०:३०) आणि सायन ते दापोली (संध्या. ७:३०).
ठाणे CBS (२८ फेब्रु. पासून): महाड, खेड शिंदी, साखरपा, गुहागर, खेड आणि दापोलीसाठी रात्री ९:०० ते १०:०० च्या दरम्यान बसेस उपलब्ध असतील.
बोरीवली (२८ फेब्रु. पासून): खेड (सकाळी ८:३०), लांजा (संध्या. ६:३०) आणि दापोली (रात्री ९:३०).
विठ्ठलवाडी (२८ फेब्रु. पासून): चिपळूण, महाड, खेड, गुहागर आणि दापोलीसाठी सकाळ आणि रात्रीच्या सत्रात बसेस सोडल्या जातील.
प्रवाशांसाठी विशेष सवलत
या प्रवासात प्रवाशांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे: १. महिला सन्मान योजना: सर्व महिला प्रवाशांना तिकीट दरात ५०% सवलत मिळणार आहे. २. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना: ७५ वर्षांवरील सर्व प्रवाशांना सर्व प्रकारच्या एसटी बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे यंदाचा शिमगोत्सव चाकरमान्यांसाठी अधिक सुखकर आणि आनंददायी होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

