वर्धा: वर्धा (Wardha) जिल्ह्यातील आर्वी तालूक्यात एका अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात खुलासा झाल्याची बातमी समोर आली आहे. डॉक्टर रेखा कदम यांच्या रूग्णालयाच्या मागील परिसरात खोदकाम केले असता जमिनीत पुरलेल्या भ्रूणाच्या अवशेषासह चार ते पाच कवट्या आणि रक्ताने माखलेले कपडे तसेच आणि एक गर्भपिशवी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (Illegal Abortion case minor girl in wardha)
स्त्रीरोग प्रसुती तज्ञ डॉक्टर रेखा कदम यांनी अल्पवयीन मुलीचा तीस हजारात गर्भपात (Illegal Abortion) केल्याची माहिती उघड झाली होती. पोलीसांनी (Police) डॉक्टर रेखा कदमसह संबंधित मुलाच्या आई वडिलांना अटक केली आहे. या गर्भपात प्रकरणात काही भ्रूण अवशेष जप्त करून ते डीएनए टेस्ट साठी लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहेत.
या प्रकरणी डॉक्टर रेखा कदम यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आला होती. त्या दरम्यान गर्भपात करण्यात आलेला भ्रूण जप्त करण्यासाठी पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकासह पालिका पथकाला बोलावले होते. या दरम्यान डॉक्टर रेखा कदम यांच्या रूग्णालयाच्या मागील परिसरात खोदकाम सुरू केले. सुमारे तीन ते चार तास खोदकाम केल्यानंतर हे अवशेष पोलिसांच्या हाती लागले. हा सर्व प्रकार पोलिसांनी तब्बल चार तास शुट केला आणि कदम हॉस्पिटल मधून सर्व रेकॉर्ड जप्त करण्यात आल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयाच्या मागील भागात बायोगॅस प्रकल्पाचा खड्डा खणण्यात आला होता. मात्र, तो वापरात नसल्याने या खड्ड्यात दवाखान्यातील इतर वेस्टेज साहित्य टाकले जात होते. पोलिसांनी पंचनामा करून अनेक गोष्टी जप्त केल्या असून सापडलेले अवशेष डीएनए टेस्ट साठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे या हाडाचे अवशेष जनावराचे की माणसाचे हे रिपोर्ट मिळाल्यावरच कळेल.
दरम्यान, काल डॉक्टर रेखा कदम यांचा दोन दिवसाचा पीसीआर संपल्यामुळे त्यांना काल बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ज्योत्स्ना गिरी विशेष सेल आर्वी तालूका यांनी दिली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.