

ओरोस: सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. ओरोस येथील हॉटेल राजधानीसमोरील हायवे रोडवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई करत एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत तब्बल ८० लाख ७५ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राघोबा रामचंद्र कुंभार (वय ३५, रा. माऊसवाडी, पेडणे-गोवा) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ५५ लाख ७५ हजार ६०० रुपये किमतीची गोवा बनावटीची देशी-विदेशी दारू आणि २५ लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो असा एकूण ८० लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची दोन पथकं सावंतवाडी उपविभागात शासकीय वाहनानं गस्त घालत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो गोव्यातून मुंबईकडे दारू वाहतूक करत आहे.
या माहितीच्या आधारे पथकांनी हॉटेल राजधानी (ओरोस) परिसरात दबा धरून कारवाई राबवली. संशयित टेम्पो आल्यानंतर त्याला थांबवून चालकाकडे चौकशी केली असता, सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन अधिक विचारणा केल्यानंतर गाडीत गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स असल्याचे त्याने कबूल केले.
पोलिसी तपासादरम्यान आरोपीने सांगितले की, हा दारू साठा मिलिंद राणे (रा. इन्सुली, ता. सावंतवाडी) यांच्या सांगण्यावरून, त्यांच्या मालकीच्या गाडीतून मुंबईकडे नेत होता. या प्रकरणात आणखी व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता असून, पुढील तपास सुरु आहे.