Mumbai-Goa Highway: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाची हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. या हवाईपाहणीचे फोटोज आणि व्हिडिओज त्यांनी ट्विटरवरून शेअर केले आहेत. मंत्री गडकरी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोतून या महामार्गाचे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे.
या व्हिडिओतून केंद्रीय मंत्री या महामार्गाची पाहणी करताना दिसतात. तसेच अधिकाऱ्यांना ते विविध सूचनाही करताना दिसतात. यावेळी गडकरी यांच्यासमवेत हेलिकॉप्टरमध्ये महाराष्ट्रातील मंंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत देखील बसलेले दिसत आहेत.
दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे गडकरी यांनी सांगितले आहे. या महामार्गामुळे महाराष्ट्राच्या कोकण विभागातील विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई-गोवा महामार्गाने महाराष्ट्रातील कोकणातील 66 पर्यटनस्थळांना स्पर्श केला आहे. यामुळे विकासाला चालना मिळणार आहे. तसेच फळे आणि इतर उत्पादनांची जलद वाहतूकही करणे सोपे होणार असल्याचे गडकरींनी सांगितले.
नितीन गडकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची आज पाहणी केली. या प्रकल्पाची एकूण 10 पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. आपले मंत्रालय वाहतुकीला अडथळा आणणारे टोल नाके न ठेवता महामार्गांवर उपग्रह आधारित भाडे संकलन सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
तसेच पर्यटन आणि दळणवळणाच्या उद्देशाने लांब समुद्रकिनारा लाभलेल्या कोकण प्रदेशासाठी सी प्लेन, हॉवरक्राफ्ट आणि वॉटर टॅक्सी सिस्टिमच्या व्यवहार्यतेचा महाराष्ट्राने अभ्यास करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.