VIDEO: एकाच वेळी 75 डॉल्फिन्स! मालवणच्या समुद्रात निसर्गाचा अद्भुत नजारा; ड्रोनमध्ये कैद झाले विलोभनीय दृश्य, पाहा व्हिडिओ

Malvan Beach 75 Dolphin Sighting Video: निसर्गाच्या वरदानाने नटलेल्या कोकण किनारपट्टीने पुन्हा एकदा पर्यटकांना आणि पर्यावरणप्रेमींना थक्क केले आहे.
Malvan Beach 75 Dolphin Sighting Video
Malvan Beach 75 Dolphin Sighting VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Malvan Chiwla Beach 75 Dolphin Sighting Video

मालवण, सिंधुदुर्ग: निसर्गाच्या वरदानाने नटलेल्या कोकण किनारपट्टीने पुन्हा एकदा पर्यटकांना आणि पर्यावरणप्रेमींना थक्क केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समुद्रात एकाच वेळी ७५ हून अधिक 'इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन्स'चा वावर पाहायला मिळाला. सहसा दोन-तीनच्या समूहात दिसणारे हे सागरी जीव एवढ्या प्रचंड संख्येने एकत्र बागडताना दिसण्याची ही घटना दुर्मिळ मानली जात असून, याचा विहंगम नजारा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सर्वेक्षणादरम्यान लाभले भाग्य

मिळालेल्या माहितीनुसार, मालवण समुद्रात 'सरगॅसम' या समुद्री शैवालाच्या मॅपिंग प्रकल्पाचे काम सुरू होते. या वैज्ञानिक सर्वेक्षणादरम्यान सागरी जीव संशोधक विशाल भावे आणि त्यांच्या पथकाला समुद्राच्या लाटांवर काही हालचाल जाणवली. सुरुवातीला हा आकडा कमी वाटत होता, परंतु जेव्हा ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने आकाशातून चित्रीकरण करण्यात आले, तेव्हा संशोधकही चकित झाले. निळ्याशार पाण्यात ७५ हून अधिक डॉल्फिनचा मोठा ताफा एका लयीत पोहताना आणि सूर मारताना दिसून आला.

सागरी पर्यावरणासाठी शुभ संकेत

मालवणचा समुद्रकिनारा पर्यटकांना नेहमीच डॉल्फिन सफारीचा आनंद देतो. मात्र, इतक्या मोठ्या समूहात (Pod) डॉल्फिनचे दर्शन होणे हे सागरी जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक मानले जात आहे. संशोधकांच्या मते, समुद्रातील अन्नाची उपलब्धता आणि सुरक्षित वातावरण यामुळेच हे डॉल्फिन एवढ्या मोठ्या संख्येने एका ठिकाणी जमा झाले असावेत. ड्रोनद्वारे टिपलेले हे फोटो आणि व्हिडिओ मालवणच्या पर्यटनाला नवी उंची देणारे ठरत आहेत.

हा निसर्गाचा अद्भूत आविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी चिवला बीचवर होऊ लागली आहे. "आम्ही अनेकदा डॉल्फिन पाहिले आहेत, पण एकाच वेळी ७५ डॉल्फिन पाहणे हे डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य होते," असं मत स्थानिकांनी व्यक्त केलंय. कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ही घटना सागरी संवर्धनाच्या गरजेवर पुन्हा एकदा प्रकाश टाकत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com