शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन थेट शिवसेना पक्षावरच दावा सांगितला आहे. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद आता निवडणूक आयोगाकडे (Election Commission) गेला आहे. निवडणूक आयोगाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिंदे गट आणि शिवसेने यांना आठ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. शिवसेनेच्या वतीने मात्र यासाठी एक महिन्याची मुदत मागितली होती. आयोगाने ठाकरे गटाला (Uddhav Thackrey) चार आठवड्यांचा वेळ देण्यास नकार दिला असून, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी फक्त 15 दिवसांची मुदत दिली आहे.
शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाचा यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात वाद सुरू आहे. चिन्हाचा हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचला आहे. धनुष्यबाणसंबधी कागदपत्र पूर्ततेसाठी उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगोकडून चार आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र, निवडणूक आयोगाकडून एवढा वेळ द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला 23 ऑगस्टपर्यंत आपलं म्हणणं मांडावंच लागणार आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे गटाची धाकधूक वाढली आहे.
दरम्यान, तत्पूर्वी 22 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुनावणी होणार आहे. दोन्ही गटांच्या राजकिय वाटचालीच्या दृष्टिकोनातून हा निर्णय महत्वाचा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा, विधानसभा तसेच शिवसेनेच्या राजकीय पक्ष रचनेतही आपले प्राबल्य असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यासाठीची आकडेवारी देखील त्यांनी निवडणूक आयोगासमोर मांडली आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना पक्षाचे आणि पर्यायाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.