Yuvraj Singh: भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचा 12 डिसेंबरला म्हणजेच आज 42 वा वाढदिवस आहे. युवराजने आत्तापर्यंत अनेकदा भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याला मोठ्या स्पर्धांचा खेळाडूही म्हटले जाते, कारण त्याने अनेकदा भारतासाठी आयसीसी स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी केली आहे.
त्याच्या कारकिर्दीतील 2011 वर्ल्डकप ही सर्वात लक्षवेधक स्पर्धा राहिली. या स्पर्धेत त्याने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रात आपले योगदान देताना मालिकावीराचा पुरस्कार मिळवला होता. त्यामुळे त्याच्यासाठी ही स्पर्धा एकप्रकारे यशाचे सर्वोच्च शिखरही ठरली. तो पहिल्या टी20 वर्ल्डकप 2007 विजेत्या भारतीय संघाचा भागही होता.
दरम्यान, युवराजने त्याच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 402 सामने खेळताना 35.05 च्या सरासरीने 17 शतके आणि 71 अर्धशतकांसह 11778 धावा केल्या. तसेच त्याने 148 विकेट्सही घेतल्या. या दरम्यान त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याच्याच विक्रमांचा आढावा घेऊ.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सलग 6 षटकार
युवराजने 2007 टी20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक झळकावताना एकाच षटकात सलग 6 षटकार मारण्याचाही विक्रम केला होता. त्याने भारताच्या डावात 19व्या षटकात स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध सलग 6 षटकार मारले होते. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एकाच षटकात सलग 6 षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला होता.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक
युवराज सिंगने 2007 टी20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यांत 12 चेंडूत अर्धशतक केले होते. त्यावेळी त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या विक्रमाला गवसणी घातली होती. त्याचा हा विक्रम १६ वर्षांनी नेपाळच्या दिपेंद्र सिंग ऐरेने २०२३ मध्ये मंगोलियाविरुद्ध ९ चेंडूत अर्धशतक करत मोडला.
पाचव्या क्रमांकावर सर्वाधिक शतके
युवराजने त्याच्या कारकिर्दीत 99 वनडे सामन्यांत 5 व्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. यातील 7 सामन्यांत त्याने शतकी खेळी केली आहे. त्यामुळे तो वनडेत पाचव्या क्रमांकावर सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे. त्याच्या पाठोपाठ या यादीत 6 शतकांसह एबी डिविलियर्स आहे.
सात आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने
युवराज असा एकमेव खेळाडू आहे, ज्याने 7 वेळा आयसीसी स्पर्धांमध्ये अंतिम सामने खेळले आहेत. त्याने 2000, 2002 आणि 2017 साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अंतिम सामने खेळले. तसेच त्याने 2007 आणि 2014 साली टी20 वर्ल्डकपचे अंतिम सामने खेळले. त्याचबरोबर तो 2003 आणि 2011 वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यातही भारताकडून खेळला होता.
आयसीसी स्पर्धेतील सर्वात युवा भारतीय सामनावीर
युवराज सिंग 2000 साली झालेल्या आयसीसी नॉकआऊट स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या 84 धावांच्या खेळीमुळे सामनावीर ठरला होता. त्यावेळी तो केवळ 18 वर्षे 299 दिवसांचा होता. त्यामुळे तो आयसीसी स्पर्धेत सामनावीर पुरस्कार जिंकलेला सर्वात युवा भारतीय क्रिकेटपटू ठरला होता.
वर्ल्डकपमध्ये अष्टपैलू प्रदर्शन
युवराज सिंगने 2011 साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये आयर्लंडवरुद्ध 5 विकेट्स घेतल्या होत्या आणि 50 धावाही केल्या होत्या. त्यामुळे तो वर्ल्डकप सामन्यात अर्धशतक आणि 5 विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला होता.
वर्ल्डकप 2011 चा मालिकावीर
युवराज हा एकमेव असा खेळाडू आहे, ज्याने वर्ल्डकपमध्ये 350 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत आणि 15 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 2011 च्या वर्ल्डकपमध्ये 9 सामन्यांत 362 धावा केल्या होत्या आणि 15 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे तो या स्पर्धेत मालिकावीरही ठरला होता.
19 वर्षांखालील वर्ल्डकपमधील मालिकावीर
युवराज 2000 साली 19 वर्षांखालील वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. त्यावेळी तो त्या वर्ल्डकपमध्ये मालिकावीरही ठरला होता. त्यामुळे तो पहिलाच भारतीय होता, ज्याने हा मान मिळवलेला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.