WTC Final 2023 IND vs AUS: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना खेळण्यासाठी टीम इंडियाला आयपीएल 2023 नंतर इंग्लंडचा दौरा करायचा आहे.
अशा स्थितीत टीम इंडियाचा भाग असलेल्या खेळाडूंसाठी या अंतिम फेरीत फॉर्ममध्ये राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आयपीएल 2023 च्या सुरुवातीला टीम इंडियाचा एक महत्त्वाचा खेळाडू धावा काढण्यासाठी धडपडत होता, परंतु या खेळाडूने पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शानदार खेळी करत फॉर्ममध्ये परतण्याची चिन्हे दर्शविली आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) कर्णधार केएल राहुल अजूनही आयपीएल 2023 मध्ये धावा काढण्यासाठी संघर्ष करत होता.
पण पंजाब किंग्ज (पीबीकेएस) विरुद्ध त्याची शानदार खेळी पाहायला मिळाली. जरी त्याची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. या सामन्यात केएल राहुलने (KL Rahul) 56 चेंडूंचा सामना करत 74 धावा केल्या. या खेळीत त्याच्या बॅटमधून 8 चौकार आणि 1 षटकार दिसला.
ऋषभ पंत (Rishabh Pant) गेल्या वर्षी कार अपघाताचा बळी ठरला होता, त्यामुळे तो मैदानापासून दूर आहे. अशा परिस्थितीत ऋषभ पंतच्या जागी डब्ल्यूटीसी फायनलमध्ये यष्टीरक्षणाची जबाबदारी कोण सांभाळणार, हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात समावेश केला जाईल.
अलीकडेच, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत केएस भरतचा यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला होता, पण तो आपली छाप सोडू शकला नाही. अशा परिस्थितीत केएल राहुल आता पुन्हा एकदा संघाची पहिली पसंती म्हणून दिसत आहे.
केएल राहुलने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण 47 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये राहुलने 33.44 च्या सरासरीने 2642 धावा केल्या आहेत.
यादरम्यान केएल राहुलच्या बॅटमधून 13 अर्धशतके आणि 7 शतके झळकली आहेत. त्याचवेळी, इंग्लंडमध्ये केएल राहुलने 9 कसोटी सामने खेळताना 34.11 च्या सरासरीने 614 धावा केल्या आहेत. या सामन्यांमध्ये केएलने 1 अर्धशतक आणि 2 शतके झळकावली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.