WTC 2023 Final: रहाणे-शार्दुलच्या झुंजीनंतर फॉलोऑन टळला, तरी 173 धावांची पिछाडी! पाहा भारताच्या सर्व विकेट्स

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये भारताच्या पहिल्या डावातील विकेट्स कशा गेल्या, पाहा Video
India 1st Inning | WTC 2023 Final
India 1st Inning | WTC 2023 FinalDainik Gomantak

WTC 2023 Final, India 1st inning all wickets: बुधवारपासून (7 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू झाला आहे. द ओव्हल मैदानावर सुरू असेलेल्या या सामन्यात भारताचा पहिला डाव 69.4 षटकात 296 धावांवर संपुष्टात आला.

त्यामुळे भारताने फॉलोऑन टाळला. मात्र तरी भारताला 173 धावांची पिछाडी स्विकारावी लागली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 469 धावांवर संपला होता. भारताकडून अजिंक्य रहाणेने 129 चेंडूत 89 धावांची खेळी केली. तसेच शार्दुल ठाकूरने 109 चेंडूत 51 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपल्यानंतर भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे सलामीला फलंदाजीसाठी उतरले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनीही चांगली सुरुवात केली होती, पण पण चांगल्या सुरुवातीनंतरही रोहित सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर 15 धावांवर पायचीत झाला.

त्याच्यानंतर पुढच्याच षटकात गिलला स्कॉट बोलंडने 13 धावांवर त्रिफळाचीत केले. बोलंडने टाकलेला चेंडू खेळायचा की नाही या गोंधळात गिल होता, पण अखेर त्याचे खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट जाऊन स्टंपवर आदळला.

त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तिसऱ्या सत्राला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच पुजाराला कॅमेरॉन ग्रीनने त्रिफळाचीत करत 14 धावांवर माघारी धाडले. त्याला पुजाराला चेंडूची दिशा ओळखता आली नाही.

त्यानंतर काहीवेळातच विराटला मिचेल स्टार्कने बाद केले. त्याने टाकलेला चेंडू विराटच्या बॅटला स्पर्श करून दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथने पकडला. त्यामुळे विराट 14 धावांवर बाद झाला.

पण यानंतर अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा यांनी डाव सावरताना पाचव्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. हे दोघेही संयमी खेळ करत होते. पण दुसरा दिवस संपण्यासाठी काही वेळच शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नॅथन लायनकडे चेंडू सोपवला.

लायननंही हा निर्णय योग्य ठरवत चांगल्या लयीत असलेल्या रविंद्र जडेजाला 48 धावांवर बाद केले. त्याने टाकलेला चेंडू स्पिन झाला आणि जडेजाच्या बॅट लागून स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्मिथच्या हातात गेला. त्यानंतर दुसरा दिवस संपेपर्यंत राहणे आणि भरतने आणखी यश ऑस्ट्रेलियाला मिळवून दिले नाही.

मात्र शुक्रवारी तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर लगेचच यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरतची 5 धावांवर विकेट गमावली. त्याला स्कॉट बोलंडने 39 व्या षटकात त्रिफळाचीत केले. त्यावेळी 152 धावांवर 6 विकेट्स, अशी भारताची अवस्था होती.

पण त्यानंतर रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांनी भारताचा डाव सावरताना 109 धावांची भागीदारी केली. पण ही धोकादायक ठरणारी भागीदारी कमिन्सने 62 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर तोडली. त्याने टाकलेल्या अखुड टप्प्याच्या चेंडूवर रहाणेने शॉट खेळण्याच्या प्रयत्नात 129 चेंडूत 89 धावांवर झेलबाद झाला. राहणेचा झेल गलीच्या क्षेत्रात कॅमेरॉन ग्रीनने सूर मारत घेतला.

पण यानंतरही शार्दुलने आपली लय कायम ठेवली होती. त्याने उमेश यादवबरोबर फलंदाजी करताना डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण 66 व्या षटकात उमेशला 5 धावांवर कमिन्सनेच त्रिफळाचीत केले.

दरम्यान नंतर शार्दुलने अर्धशतक पूर्ण केले, पण त्यानंतर 69 व्या षटकात त्याला कॅमेरॉन ग्रीनने चूक करण्यास भाग पाडले. शार्दुलने ग्रीनच्या चेंडूवर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण तो यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरीकडे झेल देत बाद झाला. त्याने 109 चेंडूत 51 धावांची खेळी केली.

यानंतर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण 11 चेंडूत 13 धावा करणाऱ्या मोहम्मद शमीला 70 व्या सामन्यात मिचेल स्टार्कने कॅरीकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे भारताचा डाव 296 धावांवर संपुष्टात आला.

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल स्टार्क, स्कॉट बोलंड आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com