WPL 2024 Delhi Capitals vs Mumbai Indians Arun Jaitley Stadium: महिला प्रीमियर लीग 2024 चा 12 वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
दिल्लीने मुंबईला 193 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियाचा 29 धावांनी पराभव केला. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत आपले अव्वल स्थान आणखी मजबूत केले आहे.
दरम्यान, 193 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यास्तिका भाटिया तीन चेंडूत सहा धावा करुन आऊट झाली. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मारिझान कॅपने तिला क्लिन बोल्ड केले.
त्याचवेळी, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शिखा पांडेने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सिव्हर ब्रंटला आऊट केले. कर्णधार हरमनप्रीत कौर सहा धावा करुन बाद झाली. तिलाही मारिझान कॅपने आऊट केले. मुंबई इंडियन्सला चौथा धक्का सलामीवीर हेली मॅथ्यूजच्या रुपाने बसला.
सहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर जेस जोनासनकरवी एलिस कॅप्सीने तिला झेलबाद केले. 17 चेंडूत 29 धावा करुन ती पॅव्हेलियनमध्ये परतली. चौथ्या विकेटसाठी तिने अमेलिया करसोबत 17 चेंडूत 25 धावांची भागीदारी केली.
यानंतर संघाला पाचवा धक्का अमेलियाच्या रुपाने बसला, जी केवळ 17 धावाच करु शकली. अमनजोत कौर 16 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाली. तिला जेस जोनासनने आपला बळी बनवले.
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध 20 षटकांत 4 गडी गमावून 192 धावा केल्या होत्या. मेग लॅनिंग आणि मारिझान कॅप यांनी झंझावाती अर्धशतके झळकावली. कर्णधार लॅनिंग आणि शफाली वर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी झाली होती. 31 वर्षीय लॅनिंगने 38 चेंडूत 53 धावा केल्या. तिने आपल्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले.
त्याचवेळी, शफालीने 12 चेंडूत 28 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या एलिस कॅप्सीने 19 धावा केल्या. मात्र, हेली मॅथ्यूजने तिची विकेट्स घेतली. जेमिमाने मुंबईविरुद्ध 33 चेंडूत 69 धावा केल्या. या नाबाद खेळीदरम्यान तिने 209.09 च्या स्ट्राईक रेटने आठ चौकार आणि तीन षटकार मारले.
जेस जोनासन चार धावा करुन नाबाद राहिली. तर दुसरीकडे, मुंबईकडून शबनिम, सायका, पूजा आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.