WPL 2023: शनिवारपासून महिला आयपीएल म्हणजेच वूमन्स प्रीमियर लीगला सुरुवात होत आहे. हा डब्ल्यूपीएलचा पहिलाच हंगाम असल्याने अनेकांना उत्सुकता आहे. 5 संघात होणाऱ्या या स्पर्धेचा पहिला हंगाम मुंबईत होणार आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, युपी वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ सहभागी होणार आहेत. या पाचही संघात 20 साखळी फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर 2 प्लेऑफ सामने होतील. साखळी फेरीत प्रत्येक संघ 4 सामने घरच्या मैदानावर आणि 4 सामने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर खेळणार आहे.
दरम्यान, अनेकांना प्रश्न पडला आहे की आयपीएल प्रमाणेच डब्ल्यूपीएलचे नियमही आहेत का? तसे पाहायचे झाल्यास डब्ल्यूपीएल आणि आयपीएलचे बरेचसे नियम सारखे आहेत. पण काही नियम मात्र बदलण्यात आले आहेत.
आयपीएलप्रमाणेच डब्ल्यूपीएलमध्येही सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. तसेच सुपर ओव्हरदेखील बरोबरीत सुटली, तर पुन्हा दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात येईल.
डब्ल्यूपीएलच्या एका सामन्यासाठी एकूण 4 स्ट्रॅटर्जिक टाईम-आऊट असणार आहेत. म्हणजे एका डावात दोन टाईम-आऊट होतील. यातील गोलंदाजी करणारा संघ 6 ते 9 षटकांदरम्यान, तर फलंदाजी करणारा संघ 13 ते 16 षटकांदरम्यान टाईम-आऊट घेऊ शकतो.
प्रत्येक संघाला एका सामन्यात दोन डिआरएस घेता येणार आहेत. तसेच विकेट पडल्यानंतर जर पुढील फलंदाज 90 सेंकदच्या आधी मैदानात आली नाही, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल. तसेच एखाद्या खेळाडूला सामन्यात चेंडू लागून दुखापत झाल्यास कन्कशन सब्स्टिट्यूटचा वापर करता येऊ शकतो.
प्रत्येक संघाला सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 परदेशी खेळाडू खेळवण्याची परवानगी आहे. पण याला एक अपवाद असा आहे की सहसदस्य देशांमधील एका खेळाडूला पाचवा परदेशी खेळाडू म्हणून खेळवले जाऊ शकते. दरम्यान, केवळ दिल्ली कॅपिटल्स संघात सहसदस्य देशातील एक खेळाडू आहे.
पाच संघापैकी तीन संघ प्लेऑफमध्ये खेळतील. साखळी फेरीनंतर गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर राहाणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल. तसेच गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर रहाणारा संघ एलिमिनेटरचा सामना खेळेल. एलिमिनेटरमध्ये विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करणारा दुसरा संघ ठरेल.
दरम्यान, आयपीएल 2023 मध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू करण्यात येणार आहे. मात्र, डब्ल्यूपीएलमध्ये हा नियम सध्या लागू करण्यात आलेला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.