Women's Cricket World Cup 2017 winner Alex Hartley Announces Retirement :
इंग्लंडची फिरकीपटू ऍलेक्स हार्टली हिने वयाच्या 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ती आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप 2017 स्पर्धेच्या विजेत्या इंग्लंड संघाचा भाग राहिली होती.
साल 2017 मध्ये झालेल्या महिला क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध हार्टलीने हरमनप्रीत कौर आणि सुशमा वर्मा यांच्या महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. त्यांच्या विकेट्स घेत तिने इंग्लंडला विश्वविजेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
हार्टली या स्पर्धेत इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट्स घेणारी दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाज होती. तिने 8 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या होत्या.
हार्टलीने तिच्या स्वत:च्या पॉडकास्ट नो-बॉलमध्ये तिच्या निवृत्तीची घोषणा केली. तिने म्हटले की 'मी अधिकृतरित्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. मी नक्कीच हे सर्व मिस करेल. मला वाईट वाटेल. पण हे योग्य आहे, नाही का? मी याबद्दल बऱ्याच वर्षापासून विचार करत होते.'
तसेच तिने असेही म्हटले की तिने जे काही यश मिळवले आहे, त्याबद्दल तिला अभिमान वाटत आहे.
हार्टलीने जून 2016 मध्ये इंग्लंड महिला संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ती इंग्लंड संघाकडून अखेरचा सामना 2019 साली खेळली. तिने तिच्या कारकिर्दीत 28 वनडे सामने खेळले. या 28 सामन्यांमध्ये तिने 24.35 च्या सरासरीने 39 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तिने 4 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 3 विकेट्स घेतल्या आहेत.
तिने वनडेत दोन वेळा 4 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. तसेच तिने 3 वेळा वनडेत 3 विकेट्स घेतल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.