Why Yuzvendra Chahal not selected In India Squad for ICC ODI Cricket World Cup 2023:
मंगळवारी (५ सप्टेंबर) वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी भारताच्या १५ जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली. हा वनडेचा १३ वा वर्ल्डकप असून ५ ऑक्टोबरपासून भारतात खेळला जाणार आहे. भारत पहिल्यांदाच स्वतंत्रपणे वर्ल्डकपचे आयोजन करताना दिसणार आहे. त्यामुळे देखील भारतीय संघावर सर्वांचे लक्ष असणार आहे.
आता १५ जणांच्या संघाची घोषणा झाली असल्याने कोण-कोणत्या खेळाडूंवर इतिहास घडवण्याची जबाबदारी असणार हे देखील स्पष्ट झाले आहे. पण याचबरोबर असेही काही असेही खेळाडू आहेत, ज्यांची निवड अपेक्षित मानली जात होती. मात्र, त्यांना निवडण्यात आले नाही. यात युजवेंद्र चहलचाही समावेश आहे.
चहलच्या ऐवजी कुलदीप यादवला पहिली पसंती देण्यात आली. तसेच संघात रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे अष्टपैलू फिरकी गोलंदाजीसाठी पर्याय आहेत.
लेग स्पिनर असलेल्या चहलला न निवडल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहेत. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनेही चहलची निवड न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर के. श्रीकांत यांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, चहलला संघात न घेण्याचे कारण निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी संघातील समतोलपणा हे मुख्य कारण सांगितले आहे.
ते म्हणाले, 'नक्कीच रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे दोघेही डाव्या हाताचे फिरकीपटू आहेत, ही चर्चा झाली. पण तरी दोघेही फलंदाजीत सखोलता देतात. कुलदीपही फलंदाजांपासून चेंडू दूर ठेवू शकतो. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला ऑफस्पिनरची गरज असते, पण आम्हाला या १५ जणांमधूनच सर्वोत्तम समतोल साधता येत आहे.'
'वेगवान गोलंदाजांना टी२० पेक्षा वनडेत अधिक गोलंदाजी करायची असते आणि त्यामुळे जर संघात ऑफ स्पिनर नसेल, तर तुमच्यावर थोडा अधिक दबाव असतो, परंतु, आम्ही जे खेळाडू आमच्याकडे आहेत, त्यात आनंदी आहोत.'
आगरकर चहलबद्दल म्हणाले, 'चहलबद्दलही चर्चा झाली. पण कधीकधी संघात समतोल साधणे महत्त्वाचे असते. कुलदीपने चांगली कामिगरी केली आहे आणि अक्षरनेही. पण संघात दोन मनगटी फिरकीपटू खेळवणे कठीण आहे, त्याचमुळे चहलला संघात घेतलेले नाही.'
चहल हा उजव्या हाताचा मनगटी फिरकीपटू आहे, तर कुलदीपही डाव्या हाताने मनगटी फिरकीपटू (चायनामन) आहे.
चहलला संघात न घेण्याचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दल विचार करायचा झाल्यास अनेकांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे की संघात एकही उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणारा गोलंदाज नाही.
जडेजा आणि अक्षर हे दोघेही डावखुरे असून बोटांचा वापर करून फिरकी गोलंदाजी करतात. तसेच कुलदीपही डावखुरा आहे. त्यामुळे विरोधी संघात डावखुरे फलंदाज असतील, त्यावेळी ऑफ स्पिनर आणि लेग स्पिनर महत्त्वाचे ठरतात. मात्र, आता भारताकडे हा पर्याय नसणार आहे.
आकाश चोप्रा यांनी व्यक्त केली निराशा
याबद्दल आकाश चोप्राने जिओ सिनेमाला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की 'मी संघ निवडीनंतर चकीत झालो नसलो, तरी चहलच्या निवडीची गरज भासली नसल्याचे पाहून निराश झालो आहे. आपण जडेजा आणि अक्षर यांना एकत्र खेळवू शकत नाही.'
'स्पर्धेत अशीही परिस्थिती उद्भवेल, जिथे तुम्हाला ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरुद्ध खेळायचे आहे, ज्या संघात बरेच डावखुरे फलंदाज आहेत. त्यावेळी ऑफ स्पिनरचा पर्याय असणे महत्त्वाचे असते. कदाचीत असे वाटत आहे की त्यांनी पूर्ण विचार केलेला नसावा. मला आशा आहे की हा निर्णय त्यांच्या विरोधात जाऊन भारतीय संघासाठी भविष्यात धोकादायक ठरू नये.'
गोलंदाजीतील विविधता
आकाश चोप्रा यांच्या प्रतिक्रियेचा विचार करायचा झाल्यास जडेजा आणि अक्षर हे फलंदाजीत जरी योगदान देऊ शकत असले, तरी त्यांची गोलंदाजी शैली जवळपास सारखीच आहे. त्यामुळे त्यांना एकत्र खेळवताना समस्या होऊ शकते. तसेच जर त्या दोघांनाही एकत्र खेळवले नाही, तर भारताकडे प्लेइंग इलेव्हनमध्ये फिरकी गोलंदाजीचे दोनच पर्याय उपलब्ध होऊ शकतात.
त्यातच स्पर्धा भारतात होणार आहे, त्यामुळे फिरकी गोलंदाजांचे योगदान महत्त्वाचे राहणार, यात शंका नाही. त्याचमुळे विरोधी संघही आपल्या संघात फिरकी गोलंदाजांना स्थान देताना दिसत आहेत.
त्यामुळे भारतीय संघाच्या निवड समितीकडे अक्षर पटेलला राखीव खेळाडूंमध्ये स्थान देऊन एखाद्या लेग स्पिनर किंवा ऑफ स्पिनरला १५ जणांच्या संघात संधी देता आली असती. त्यामुळे उजव्या आणि डाव्या हाताच्या फिरकीपटूंचे संमिश्रणही संघात खेळवता आले असते.
तसेच लेग/ऑफ स्पिनर, चायनामन आणि ऑर्थोडॉक्स स्पिनर हे तिन्ही पर्याय उपलब्ध असते, ज्याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकला असता.
आता ज्याप्रमाणे निवड समितीने समतोलपणाचे कारण सांगितले आहे आणि अष्टपैलू खेळाडूंना अधिक पसंती देण्याचे कारण सांगितले आहे, त्याचा विचार करायचा झाल्यास हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर हे वेगवान गोलंदाजी करणारे अष्टपैलू संघात आहेत.
त्यामुळे त्यांच्यासह संघाला दोन मुख्य वेगवान गोलंदाज खेळवता येणार आहेत. त्यासाठी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह हे पर्याय आहेत. त्यामुळे भारतीय संघाला तिन्ही फिरकीपटूंना संघात खेळवायचे असेल, तर हार्दिक, शार्दुल, शमी, सिराज आणि बुमराह यांच्यापैकी तिघांनाच प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देता येणार आहे, तसेच जर ४ वेगवान गोलंदाज घेतले, तर दोनच फिरकीपटू खेळवता येणार आहेत. त्यामुळे संघात जरी फलंदाजीत सखोलता मिळाली, तरी मग गोलंदाजी फळीत विविधता मिळणार नाही.
याशिवाय एका महत्त्वाच्या मुद्यावरही आकाश चोप्रा यांनी प्रकाश टाकला. तो मुद्दा म्हणजे भारतीय निवड समितीचा फलंदाजांवर विश्वास नाहीये का? कारण जर ९ व्या क्रमांकावरही एक असा अष्टपैलू खेळवण्याचा विचार करत आहे, जो चांगली फलंदाजी करतो.
आकाश चोप्रा यांच्या म्हणण्यानुसार हे तेव्हा होते, जेव्हा तुमच्या पहिल्या ६ फलंदाजांमधील एकाद-दोन खेळाडूंच्या फॉर्मवर तुम्ही अवलंबून राहु शकत नाही. त्याचवेळी तुम्हाला अधिक सखोलतेची गरज असते.
संघात ४ मुख्य गोलंदाज आणि जडेजा व हार्दिक हे दोन अष्टपैलू योग्य आहेत. दोन अष्टपैलूंसह काम व्हायला पाहिजे, पण जर तिसरा अष्टपैलू असेल, तर ती संघासाठी अधिक चांगली गोष्ट आहे.
दरम्यान, भारतीय निवड समितीने चार अष्टपैलू खेळाडूंना संधी दिली आहे, त्यामुळे त्यातील तीन खेळाडू तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळतील, अशी दाट शक्यता आहे. अशा वेळी जडेजा आणि अक्षर यांना खेळवायचे झाल्यास भारताकडे विविधता राहणार नाही.
तसेच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या स्पर्धेचे स्वरुप. सर्व संघ साखळी फेरीत ९ सामने खेळणार आहेत. भारतीय संघाला हे सर्व ९ सामने ९ वेगवेगळ्या मैदानात खेळायचे आहेत. हा मुद्दा लक्षात घेता भारतीय संघाच्या गोलंदाजीत विविधता असणे, महत्त्वाचे ठरते. कारण प्रत्येक ठिकाणाची परिस्थिती, वातावरण आणि खेळपट्टी यात बदल असणार आहेत.
या सर्व गोष्टी लक्षात घेता चहल किंवा अश्विनसारखा ऑफ स्पिनर संघात नसणे भारतीय संघाला महागात पडणार नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण आता संघ निवड झाल्याने भारतीय संघाला उपलब्ध खेळाडूंसह चांगली कामगिरी करून टीकाकारांना चोख उत्तर द्यावे लागेल. दरम्यान आता भारतीय संघ कशी कामगिरी करतात हे पाहाणे औत्सुक्याच ठरणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.