Carlos Alcaraz: कोण आहे कार्लोस अल्कारेज, ज्यानं 20 व्या वर्षीच जोकोविचच्या वर्चस्वाला दिला धक्का

Carlos Alcaraz: 20 वर्षांच्या कार्लोस अल्कारेजने जोकोविचला पराभूत करत विम्बल्डन २०२३ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.
Carlos Alcaraz
Carlos AlcarazDainik Gomantak
Published on
Updated on

Who is Carlos Alcaraz? : रविवारी विम्बल्डनमध्ये टेनिस चाहत्यांनी इतिहास घडताना पाहिला. गेल्या काही वर्षात नोव्हाक जोकोविचने ग्रँडस्लॅम स्पर्धेत निर्माण केलेल्या त्याच्या वर्चस्वाला धक्का देण्याचं काम अवघ्या 20 वर्षांच्या कार्लोस अल्कारेजने केले. तब्बल 23 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या जोकोविचला त्याने अंतिम सामन्यात पाच सेटमध्ये तगडी लढत देत पराभूत केले.

त्यामुळे टेनिस जगतात आता बीग थ्रीच्या युगानंतर नव्या युगाची सुरुवात अल्कारेजने केली असल्याचे अंदाजही अनेकांनी व्यक्त केले. खरंतर अल्कारेजने यापूर्वी गेल्यावर्षी अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. तसेच तो या स्पर्धेत अव्वल मानांकित खेळाडू म्हणून खेळत होता. पण तरीही जवळपास दोन दशकांचा अनुभव असलेला जोकोविचलाच विम्बल्डन विजयाचा दावेदार म्हटले जात होते. हाच जोकोविच त्याचा अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी होता.

जोकोविचने गेल्या चारही विम्बल्डन स्पर्धांचे अंतिम सामने जिंकले होते. त्याला पराभूत करणे नक्कीच सोपं काम नव्हतं आणि म्हणूनच अल्कारेजने त्याच्या विरुद्ध मिळवलेला विजय खास ठरला. गेल्या 4-5 वर्षात बिग थ्री म्हणजेच रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि जोकोविच यांना ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात पराभूत करत विजेतेपद कोणत्या खेळाडूला जिंकता आले नव्हते.

मात्र, 20 वर्षांच्या अल्कारेजने ते करून दाखवले आणि त्याचमुळे जगाचं लक्ष त्याने वेधलं. एक प्रसिद्ध वाक्य आहे की 'सफलताओं का शीर्षक ना हो, तो संघर्षों की कहानी कोई नही पढ़ता'. तसंच अल्कारेजने अगदी कमी वयात मोठे यश मिळवले, पण ज्यावेळी त्याने सध्या टेनिस जगतात सर्वोत्तम असणाऱ्या जोकोविचला पराभूत केले, त्यावेळी जगाने त्याची दखल घेतली.

महत्त्वाचे म्हणजे जोकोविचने त्याला बिग थ्रीमधील त्याच्याकडे सर्वोत्तम क्षमता असल्याचेही मान्य केले. पण हा अल्कारेज आहे कोण? त्याच्या कारकिर्दीची सुरुवात झाली कशी, हे देखील जाणून घेऊ.

Carlos Alcaraz
Wimbledon 2023: अल्कारेज नवा विम्बल्डन विजेता! दिग्गज जोकोविचला थरारक फायनलमध्ये पराभवाचा धक्का

कुटुंबातूनच टेनिसचं बाळकडू

अल्कारेजचा जन्म 5 मे 2003 रोजी स्पेनमधील मुर्शिया येथील अल पालमर या छोट्या गावात झाला. त्याचे पूर्ण नाव कार्लोस अल्कारेज गार्फिया असे आहे. त्याचे आजोबा आणि वडील टेनिस खेळायचे. त्याचे वडिल कार्लोस अल्कारेज गोन्झालेझ हे 90 च्या दशकात टेनिस खेळत होते. ते स्पेनमधील सर्वोत्तम 40 खेळाडूंपैकी एक होते. ते स्पेनमध्ये अकादमीही चालवतात.

त्यांनीच अल्कारेजचे वय तीन-चार वर्षे असेल, तेव्हाच हातात रॅकेट दिली आणि अल्कारेजचा टेनिसपटू बनण्याचा प्रवास सुरु झाला. त्याच्या वडिलांनी त्याला वयाच्या 15-16 वर्षापर्यंत प्रशिक्षणही दिले. ते अनेक सामन्यांसाठी त्याच्याबरोबर फिरले. आजही ते त्याच्याबरोबर असतात.

अल्कारेझला तीन भाऊ देखील आहेत. मोठा भाऊ अभिनय क्षेत्रात आहे, तर दोन्ही लहान भाऊ शाळेत आहेत. अल्कारेज लहान वयापासूनच टेनिसमध्ये प्रगती दाखवत गेला. त्याच्या वयाच्या 8 व्या वर्षापासून 16व्या वर्षापर्यंत त्याच्याबरोबर असणाऱ्या स्पोर्ट सायकॉलॉजिस्ट जोसेफिना क्युटिलास यांनी अल पेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की अल्कारेझला लहानपणापासूनच काय करायचे आहे, हे माहित होते.

अल्कारेजला त्याची आई वर्जिनिया गार्फिया स्कँडनने देखील साथ दिली. ती देखील त्याच्या अनेक सामन्यांसाठी उपस्थित असते. त्याच्या आईची पार्श्वभूमी क्रीडा क्षेत्रातली नसली, तरी ती त्याला आणि त्याच्या वडिलांसाठी मोठा आधार आहे. अल्कारेजने जिंकलेल्या पहिल्या ग्रँडस्लॅमवेळीही ती कोर्टमध्ये होती.

नदालचा आदर्श

स्पेनचाच असलेला नदाल अल्कारेजचा आदर्श आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे तेव्हा नदालने पहिल्यांदा 2005 मध्ये ग्रँडस्लॅम जिंकले होते, तेव्हा अल्कारेज अवघ्या 2 वर्षांचा होता. नदाल टेनिसमध्ये त्याचे नाव मोठे करत होता, तेव्हा दुसरीकडे त्याच्याच देशातील अल्कारेज त्याच्यासारखाच मोठा टेनिसपटू होण्याचं स्वप्न पाहात होता.

अल्कारेजनेही म्हटले होते की 'मला राफासारखे व्हायचे आहे. पण माझा खेळ बराच रॉजर फेडरर सारखा आहे. पण माझ्यासाठी आदर्श राफा आहे, कारण माझा खेळ त्याच्याप्रमाणेच मातीच्या कोर्टला अनुकूल आहे.'

अल्कारेजने नदालला पराभूतही केले आहे. सर्वात पहिल्यांदा अल्कारेजने नदालला मद्रिदमध्ये पराभूत केले होते. त्यावेळी नदालने त्याचे तोंडभरुन कौतुक करताना स्पेनमधून आणखी एक उदयोन्मुख टेनिसपटू पुढे येत असल्याचा आनंदही व्यक्त केला होता.

प्रशिक्षकाचे योगदान

अल्कारेजला त्याच्या वडिलांनी 15-16 वर्षापर्यंत प्रशिक्षण दिले, पण 2018 मध्ये त्यांनी त्याला ज्युआन कार्लोस फेरेरा यांच्या अकादमीमध्ये दाखल केले. तेव्हापासून ज्युआन कार्लोस फेर्रेरा अल्कारेजचे प्रशिक्षक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अल्कारेजने चांगली प्रगती केली.

ज्युआन कार्लोस फेरेरा माजी अव्वल क्रमांकावरील टेनिसपटू राहिले असून त्यांनी 2003 साली फ्रेंच ओपन स्पर्धाही जिंकली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अल्कारेजने 2022 अमेरिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. तसेच वयाच्या 19 वर्षीच तो जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकही मिळवला.

नव्या युगाची सुरुवात

अल्कारेजकडे भविष्यातील सुपरस्टार म्हणून पाहिले जात आहे. कारण अजूनही तो केवळ २० वर्षांचा असून त्याने वयाची 21 वर्षे पूर्ण करण्यापूर्वीच 2 ग्रँडस्लॅम विजेतीपदं आपल्या नावावर केली आहेत. असा कारनामा करणारा तो ओपन एरामधील केवळ पाचवाच पुरुष टेनिसपटू आहे. त्यामुळे येत्या वर्षात अल्कारेजने आणखी मोठ्या यशाला गवसणी घातली घातली, तरी आश्चर्य वाटायला नको.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com