Virat Kohli's 29th Test century similarities with Sachin Tendulkar, Sunil Gavaskar:
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात गुरुवारपासून त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल मैदानात कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शतकी खेळी केली. त्याच्या या शतकामुळे खास योगायोगही घडल्याचे पाहायला मिळाले.
विराटने त्याला या 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना भारताकडून पहिल्या डावात 206 चेंडूत 11 चौकारांसह 121 धावा केल्या. हे विराटचे 29 वे कसोटी शतक आणि 76 वे आंतरराष्ट्रीय शतक आहे.
विराटच्या या शतकामुळे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 29 व्या कसोटी शतकाच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. सचिननेही 21 वर्षांपूर्वी 2002 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच तेही क्विन्स पार्क ओव्हल मैदानातच त्याचे 29 वे कसोटी शतक केले होते.
विशेष म्हणजे विराट आणि सचिन यांनी 29 वे कसोटी शतक करण्यासाठी बॅकवर्ड पाँइंटच्या क्षेत्रातच शॉट खेळला. फरक फक्त इतकाच होता की विराटच्या शॉटवर भारताला चौकार मिळाला, तर सचिनने एकेरी धाव काढली होती. या दोघांच्या या शॉट्सचा व्हिडिओही जिओ सिनेमाने शेअर केला आहे.
इतकेच नाही, तर विराटच्या बॅटमधून परदेशात तब्बल 5 वर्षांनी कसोटी शतक आले आहे. खास गोष्ट म्हणजे त्याचे हे शतक भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 100 व्या कसोटी सामन्यात आले आहे. त्याचमुळे त्याचे हे शतक दिग्गज सुनील गावसकरांनी केलेल्या शतकाशीही साम्य दाखवणारे आहे.
40 वर्षांपूर्वी 1983 मध्ये दिल्लीमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज संघातील 50वा कसोटी सामना होता, त्याच सामन्यात गावसकरांनी 29 वे कसोटी शतक केले होते. विशेष म्हणजे त्यावेळी गावसकरांनीही विराटप्रमाणेच 121 धावांचीच खेळी केली होती.
दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास, भारताने पहिल्या डावात 128 षटकात सर्वबाद 438 धावा केल्या. या डावात विराटच्या शतकाव्यतिरिक्त रोहित शर्माने 80 धावांची, यशस्वी जयस्वालने 57 धावांची, रविंद्र जडेजाने 61 धावांची आणि आर अश्विनने 56 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून केमार रोच आणि जोमेल वॉरिकन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
तसेच दुसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 41 षटकात 1 बाद 86 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघ अद्याप 352 धावांनी आघाडीवर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.