Mukesh Kumar phone call with mother after Test debut: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात त्रिनिदादला कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. या सामन्यातून भारताकडून मुकेश कुमारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने पदार्पण केल्यानंतर त्याच्या आईला फोन केला होता, हा भावूक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
20 जुलैला सुरु झालेल्या या सामन्याआधी दिग्गज फिरकीपटू आर अश्विनकडून मुकेशला पदार्पणाची कॅप देण्यात आली. तो भारताकडून कसोटी पदार्पण करणारा 308 वा खेळाडू आहे. त्याने पदार्पणाच्या दिवशी संध्याकाळी हॉटेलमध्ये परतल्यानंतर त्याच्या आईला फोन केला होता, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की तो आईशी फोनवर बोलत आहे की तिच्या प्रार्थनेनंतर आणि इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर हे यश मिळाले आहे.
तसेच मुकेशने त्याच्या आईशी झालेल्या संभाषणाबद्दलही सांगितले. त्याने असेही सांगितले की इतक्या वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा दिवस खूप खास आहे.
आईबरोबर झालेल्या संभाषणाबद्दल तो म्हणाला, 'माझ्या आईने मला सांगितले की नेहमी खूश राहा. पुढे जात राहा. तिने सांगितले की तिचे आशिर्वाद नेहमीच माझ्याबरोबर आहेत. तिला फक्त एवढेच हवे असते की मी सुधारणा करत राहू आणि आणखी चांगले खेळत राहावे.'
'हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे आणि मी किती खूश आहे, हे शब्दात सांगू शकत नाही. मी सकाळी पदार्पण केले आणि संध्याकाळी मी माझ्या आईशी बोलत आहे. मला काय बोलावे, हे सुचत नाहीये.'
पश्चिम बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या 29 वर्षीय मुकेश कुमारने गेल्या काही महिन्यांमध्ये शानदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. तो बंगालचा मुख्य वेगवान गोलंदाजही आहे. त्याने 2022-23 रणजी हंगामात 22 विकेट्स घेत संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
तसेच त्याने इराणी कप 2022 स्पर्धेतही सौराष्ट्रविरुद्ध शेष भारत संघाकडून पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली होती. तसेच संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता, त्यामुळे त्याने सामनावीर पुरस्कारही जिंकला होता.
त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल 2023 स्पर्धेतही 10 सामन्यात 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या ७ विकेट्समध्ये विराट कोहली, सूर्यकुमार यादव, जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल अशा फलंदाजांच्या विकेट्सचा समावेश आहे.
मुकेशने आत्तापर्यंत 39 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 2.70 च्या इकोनॉमी रेटने 149 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 24 ए श्रेणी सामने खेळताना 26 विकेट्स घेतल्या आहेत, तर 33 टी20 सामने खेळताना 32 विकेट्स घेतल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.